धर्मस्थळे मोडणारा गजाआड
By admin | Published: July 16, 2017 02:25 AM2017-07-16T02:25:17+5:302017-07-16T02:25:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्ककुडचडे : राज्यात दोन महिने धार्मिक स्थळांची विटंबना करून सरकारसह संपूर्ण गोव्यातील पोलिसांची झोप उडवणाऱ्या माथेफिरूला
लोकमत न्यूज नेटवर्क
कुडचडे : राज्यात दोन महिने धार्मिक स्थळांची विटंबना करून सरकारसह संपूर्ण गोव्यातील पोलिसांची झोप उडवणाऱ्या माथेफिरूला गोवा पोलिसांनी अखेर शनिवारी पहाटे जेरबंद केले. फ्रान्सिस्को परेरा (वय ५५) या कुडचडे येथील टॅक्सी चालकाला शनिवारी पहाटे अटक केल्यानंतर त्याच्याकडून या गुन्ह्यांबरोबरच १४ वर्षांत गोव्यात घडलेल्या अशा प्रकारच्या दीडशेहून अधिक गुन्ह्यांचाही छडा लागला. या सर्व प्रकरणांत आपलाच हात असल्याचा कबुली जबाब त्याने दिल्याने पोलीस दलही हादरून गेले. त्याला केपे येथील न्यायालयात हजर केले असता चौकशीसाठी तीन दिवसांची कोठडी मिळाली आहे.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व गुन्ह्यांची कबुली आरोपीने दिली आहे. अशा प्रकारे इतक्या गुन्हेगारी प्रकरणांचा एका झटक्यात तपास लागण्याची गोव्यातील ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी १९९९ मध्ये दक्षिण गोवा पोलिसांनी फेलिक्स फर्नांडिस या चोरट्याला अटक केली असता, त्यावेळी जवळपास ५९ घरफोड्यांचा तपास लागला होता. त्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी प्रकरणांचा तपास लागला. जून व जुलै मध्ये दक्षिण गोव्यात सुमारे १५ धार्मिक स्थळांची मोडतोड करण्यात आली. त्यातील १३ घटना ख्रिस्ती धर्मियांच्या क्रुसांच्या मोडतोडीच्या होत्या. त्यामुळे संपूर्ण गोव्यात एकप्रकारे भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले होते. या घटनांचा तपास लागत नाही यास्तव विरोधी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना लक्ष्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस खातेही दबावाखाली आले होते. ज्या परिसरात या घटना घडत होत्या त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. याच बंदोबस्ताच्यावेळी सापडलेल्या आरोपीचे वर्तन आणि हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडून त्याच्यावर लक्ष केंद्रित केले होते. पोलिसांचा संशय पक्का झाल्यानंतर शनिवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले.
या गुन्ह्यांची कबुली देताना आरोपीने सांगितले की, स्मारकांच्या आत आत्मे आणि वाईट शक्ती दडलेल्या असतात. त्यांना मुक्त करण्यासाठीच आपण मागची १४ वर्षे स्मारके आणि मूर्ती फोडायचो. मात्र, आपण कधीही कोणालाही इजा पोहोचवलेली नाही वा जीवितहानी केली नाही. तसेच मूर्ती फोडण्यामागे आपला धार्मिक विद्वेष पसरविण्याचा इरादा नव्हता, असेही त्याने सांगितले. आरोपी फ्रान्सिस्को परेरा दिवसा कुडचडे रेल्वे स्थानकाजवळ टॅक्सी चालवायचा आणि रात्रीच्यावेळी अशी कृत्ये करायचा, अशी माहिती गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी दिली. आरोपीच्या गाडीतून पोलिसांनी या कृत्यासाठी वापरण्यात येणारा हातोडाही जप्त केला. त्याने २000 मध्ये कुडचडेत एकावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यात त्याला तीन वर्षांच्या कैदेची शिक्षाही झाली होती. सप्टेंबर २00३ मध्ये त्याची मुक्तता झाली. त्यानंतर त्याने मूर्ती विटंबनेचे कूकर्म सुरू केले, अशी माहिती तपासात पुढे आली.