दिगंबर कामत की गिरीश चोडणकर? काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 12:32 PM2018-03-26T12:32:02+5:302018-03-26T12:32:02+5:30
पणजी : गोवा प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आता माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर अशा दोघांमध्येच चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसचे बहुतेक आमदार पूर्णपणे कामत यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तर पक्ष संघटनेने चोडणकर यांची साथ दिली आहे. येत्या आठ दिवसांत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे गोव्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण असतील याविषयी निर्णय घेतील.
कामत यांच्या मनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. त्यांनी लॉबिंग केले नाही पण आपली इच्छा पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांच्याकडे व्यक्त करून दाखवली आहे. कामत यांनी लोकमतला सांगितले, की मी 2007 सालच्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद मागितले नव्हते. मी लॉबिंग केले नव्हते पण मला ते मिळाले. मी पाच वर्षे गोव्याला स्थिर सरकार दिले. आताही मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी लॉबिंग करत नाही. पक्षच योग्य तो निर्णय घेईल.
चेल्लाकुमार हे दोन दिवस गोव्यात होते. त्यांनी गोव्यातील काँग्रेसच्या सर्व आमदारांशी व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मंगळवारपर्यंत चेल्लाकुमार आपला अहवाल राहुल गांधी यांना सादर करण्याची शक्यता आहे. चोडणकर हे गेली अनेक वर्षे काँग्रेसचे काम करत आहेत. ते युवक काँग्रेसचेही अध्यक्ष होते. अखिल भारतीय काँग्रेसचे ते सचिव आहेत. त्यांनीही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केला आहे. माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेऊन राजीनामा पत्रही सादर केल्याने नवा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला नेमावा लागेल. शांताराम नाईक हे स्वत: गिरीश चोडणकर प्रदेशाध्यक्ष बनावेत या मताचे आहेत, अशी माहिती सुत्रंकडून मिळाली. स्वत: शांताराम नाईक यांनी कोणतेच मत व्यक्त केलेले नाही पण किमान दहा वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम केलेल्या व्यक्तीची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदी केली जावी, असे नाईक यांनी यापूर्वी म्हटले आहे. कामत हे 2005 साली काँग्रेस पक्षात आले व 2007 साली ते मुख्यमंत्री बनले होते. कामत यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमले गेले तर गोव्यात काँग्रेसची सत्ता येईल असे चित्र काही ज्येष्ठ काँग्रेस आमदारांनी चेल्लाकुमार यांच्यासमोर उभे केले आहे. मात्र चोडणकर यांना प्रदेशाध्यक्ष केले तर नव्या युवकांना काँग्रेसमध्ये वाव मिळेल अशी चर्चा पक्षात आहे. चोडणकर यांचे राहुल गांधी यांच्याशी जवळचे संबंध आहेत.
दरम्यान, जो पक्ष काम पुढे नेऊ शकेल अशा व्यक्तीकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले जाईल. त्यासाठी युवाच कुणी हवा असा निकष आम्ही लावलेला नाही, असे चेल्लाकुमार यांनी गोवा भेट आटोपून दिल्लीला निघण्यापूर्वी लोकमतला सांगितले