गिरीश चोडणकर यांचा गोवा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 08:29 PM2019-06-28T20:29:13+5:302019-06-28T20:29:22+5:30
लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसचा जो पराभव झाला, त्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले.
पणजी : राहुल गांधी हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत नसल्याने देशातील अनेक काँग्रेस नेते आपल्या पदांचे राजीनामे देत आहेत. काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही प्रदेशाध्यक्षपद आपण सोडत असल्याचे शुक्रवारी येथे जाहीर केले आणि आपले राजीनामा पत्रही दिल्लीला पाठवून दिले.
लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसचा जो पराभव झाला, त्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी देशभरातील काँग्रेसजनांनी केली पण गांधी राजीनामा मागे घेण्यास तयार नाहीत.
गोव्यात लोकसभेच्या दोनपैकी एक जागा काँग्रेसने जिंकली. पूर्वी दोन्ही जागा भाजपकडे होत्या. मात्र यावेळी चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव केला. फ्रान्सिस सार्दिन निवडून आले. विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये मात्र केवळ एकच पणजीची जागा काँग्रेस पक्ष जिंकला. अर्थात हा वेगळा विषय असला तरी, गोवा प्रदेश काँग्रेसमध्येही या सर्व विषयांवरून चर्चा सुरूच आहे. पराभवानंतर व केंद्रात आणि गोव्यातही सत्ता न आल्याने गोव्यातील काँग्रेसचे काही आमदार हताश झालेले आहेत. मध्यंतरी ते काँग्रेसला सोडचिठ्ठीही देऊ पाहत होते. या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर चोडणकर यांच्याही वाटय़ाला अस्वस्थता येत आहे.
Girish Chodankar,Congress: Firm decision of Rahul Gandhi ji to not withdraw resignation as Congress President, morally does not permit me to continue. The defeat is our collective responsibility, hence I hereby tender my resignation forthwith as Goa Congress President (file pic) pic.twitter.com/08UEr6Mdkl
— ANI (@ANI) June 28, 2019
मात्र चोडणकर यांनी राहुल गांधी हे राजीनामा देत असल्याने आपणही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले. देशभरातील पराभवाची जबाबदारी ही आम्हा सर्वाची सामुहिक जबाबदारी आहे. राहुल गांधी त्यांचा राजीनामा मागे घेत नसल्याने आपल्याला स्वत:ला प्रदेशाध्यक्षपदी राहणो नैतिकदृष्टय़ा योग्य वाटत नाही अशी भूमिका चोडणकर यांनी घेतली आहे. चोडणकर येत्या 1 रोजी दिल्लीला जात आहेत. त्यांचा राजीनामा अजून स्वीकारला गेलेला नसल्याने तूर्त ते प्रदेशाध्यक्षपदी राहतात. त्यांनी आपले लेखी राजीनामा पत्र मात्र दिल्लीला पाठवून दिले.