‘चालकांना हेल्मेट घालण्याची बुद्धी दे’; गोवा पोलिसांचे गणपतीला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:59 PM2018-09-22T22:59:04+5:302018-09-22T22:59:20+5:30
गणपती बाप्पाला घालण्यात येणारे गा-हाणे हे आपले कुटुंब, किंवा संस्थेचे हीत साधणे यापलिकडे कधी असते असे सांगितले तर पटणे कठीणच, परंतु हणजुणे पोलीस स्थानकात पूजलेल्या सार्वजनिक गणपतीला सर्व पोलिसांनी लोकांच्या भल्यासाठी गा-हाणे घातले आहे.
पणजी: गणपती बाप्पाला घालण्यात येणारे गा-हाणे हे आपले कुटुंब, किंवा संस्थेचे हीत साधणे यापलिकडे कधी असते असे सांगितले तर पटणे कठीणच, परंतु हणजुणे पोलीस स्थानकात पूजलेल्या सार्वजनिक गणपतीला सर्व पोलिसांनी लोकांच्या भल्यासाठी गा-हाणे घातले आहे. हेल्मेट आणि सीट बेल्ट न वापरणा-या चालकांना ते वापरण्याची बुद्धी द्यावी व त्यांचा सांभाळ करावा असे साकडे गणरायाला घातले आहेत.
गणपतीच्या महापुजेनंतर विसर्जनापूर्वी गा-हाणे घालण्याची पद्धत आहे. घरातील गणपतीला कुटुंबाच्या रक्षणाचे तर सार्वजनिक गणपतीला त्या संस्थेतील सर्वांचे रक्षण करण्याचे वगैरे साकडे घातले जातात. हणजुणे पोलीस स्थानकातील सार्वजनिक गणेश मूर्तीच्या महापूजेनंतर घालण्यात आलेले गा-हाणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्तवपूर्ण संदेश देणारे होते. पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी ही माहिती दिली.
कोंकणी भाषेतून घालण्यात आलेल्या या गा-हाण्याचे भाषांतर असे: ‘हे श्री गणराया, आम्ही सर्व पोलीस तुझ्याकडे आमच्या रक्षणाची जशी प्रार्थना करतो आहोत तशीच लोकांच्या रक्षणाचीही करीत आहोत. हेल्मेट शिवाय वाहने चालविणा-यांना हेल्मेट घालण्याची व सीटबेल्ट न वापरणार्यांना ते वापरण्याची बुद्धी द्यावी, ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर न करण्याचा, भरधाव गाडी चालविणा-यांना तसे न करण्याचा आणि रस्त्याच्या बाजूने चालणा-यांची काळजी घेऊन चालविण्याचा समजुतदारपणा सर्व चालकांना द्यावा. लहान मुलांकडे वाहने न देण्याची बुद्धी पालकांना द्यावी. रस्त्यावर घडणा-या अपघातांमुळे आम्ही नैराश्येत लोटण्याची भितीही वाटत आहे. त्यामुळे सर्वांचे रक्षण करावे देवा. मंगलमूर्ती मोरया’.