लेखी द्या, अन्यथा माघार घेणार नाही; टॅक्सी व्यावसायिक मागे हटेनात, आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2024 12:42 PM2024-08-27T12:42:20+5:302024-08-27T12:42:41+5:30
टॅक्सी व्यावसायिकांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : जोपर्यंत सरकारकडून लिखित स्वरूपात पाचही मागण्या आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार पेडणे येथे टॅक्सी व्यावसायिकांनी केला आहे. काल, सोमवारी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पर्वरी येथे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर संबंधित शिष्टमंडळाने पेडणे येथे आल्यानंतर आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर लेखी आश्वासनाची मागणी लावून धरली आहे.
टॅक्सी व्यावसायिकांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस होता. मात्र आंदोलक आता लेखी मागणीवर अडून बसल्याने आज, मंगळवारीही हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आम्हाला लिखित स्वरूपात आमच्या मागण्या देण्यात याव्यात त्यानंतरच आम्ही हे आंदोलन स्थगित करू, असे शिवा वॉरियर्सचे प्रमुख रामा वारंग यांनी सांगितले.
टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत म्हणाले की, गेले पाच दिवस हे आंदोलन सुरू आहे. यापूर्वी आम्ही आमच्या न्यायहक्कांसाठी आंदोलने केली आहेत. मात्र, प्रत्येकवेळी सरकारने आश्वासन देऊन आम्हाला झुलते ठेवले आहे. ज्या सहा मागण्या केल्या होत्या त्यातील पाच मागण्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र लिखित स्वरूपात त्याबाबत आम्हाला काहीच दिलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत लिखित स्वरूपात आमच्या मागण्या मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टॅक्सी संघटनेचे आनंद गावस म्हणाले की, गेले पाच दिवस गोव्याच्या विविध भागातून टॅक्सी व्यावसायिक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. पाच दिवसांपासून आमचा व्यावसाय रखडला आहे. आमचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे सरकारने आमचे प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे.
गोवा माईल्स'बद्दल आमचा विचार सुरु
गोवा माईल्स टॅक्सी काउंटर हटवावे व गोवा माईल्सच बंद करावे याविषयी आम्ही मागणी केली होती. मात्र हा विषय संपूर्ण राज्याचा असल्याने त्यावर नंतर चर्चा करू, असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. मात्र याविषयी आम्ही लवकरच विचार विनिमय करून संपूर्ण गोव्यातील टॅक्सी बांधवांना एकत्र करणार असल्याचे चेतन कामत म्हणाले.