बेरोजगारांना रोजगाराची संधी द्या: प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 08:27 AM2024-07-22T08:27:25+5:302024-07-22T08:27:57+5:30
एसीजीएल- बीबीडी कामगार पतपुरवठा संस्थेच्या वतीने ८५ विद्यार्थ्यांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क, होंडा : औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे गेले पाहिजे, त्यामुळे व्यवसाय सुरळीतपणे चालण्यासाठी फार मदत होते. कंपनीनेसुद्धा राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, त्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
भुईपाल येथील एसीजीएल कंपनीच्या बस बांधणी विभाग कामगार पतपुरवठा संस्थेची वार्षिक सभेच्या निमित्ताने इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या परिक्षेत उच्च गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या सुमारे ८५ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम साखळी येथील रवींद्र भवनात उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर टाटा मोटर्सचे माजी उपाध्यक्ष प्रसाद रांगणेकर, सहकार खात्याचे उपनिबंधक पंकज मराठे, एसीजीएल बिबीडी कामगार संघटनेचे अध्यक्ष गुणाजी परब, गोवा राज्य सहकारी बैंक होंडा शाखेच्या व्यवस्थापक शर्मिला चणेकर, एसीजीएल कंपनीचे व्यवस्थापक दिलीप देसाई, साई नर्सिंग संस्थेचे व्यवस्थापक संतोष मळीक, एसीजीएल बिबीडी कामगार पतपुरवठा संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टिकर, उपाध्यक्ष अनिल गावडे, सचिव सत्यावन कारबोटकर, सीईओ रमेश म्हार्दोळकर, खजिनदार अनंत कोल्हापूरकर, संचालक तुळशीदास म्हाळशेकर, हरिश्चंद्र देविदास, अनिता इन्सुलकर, स्वाती गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे माजी सचिव तथा विद्यमान सीईओ रमेश म्हार्दोळकर यांनी २० वर्षांपासून सचिव पदाचा चांगला कारभार सांभाळला म्हणून त्यांना उत्कृष्ट सचिव पुरस्कार बहाल करण्यात आला होता. या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते त्यांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत शर्यद केसरकर, दुर्वा राणे सरदेसाई, श्रेयश शेटकर, तर इयत्ता बारावीच्या साईनाथ गावस, समृद्धी परब, अनिष नाईक, निश बुगडे, तेज पेटकर, श्रृजल गोसावी, साईल गाड, व प्रणव गावकर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी गणपुले हिने केले तर अनंत कोल्हापूरकर यांनी आभार मानले.