एसटी समाजाला राजकीय आरक्षण द्या; खासदार तानावडे यांनी राज्यसभेत मांडला मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 08:55 AM2024-07-25T08:55:45+5:302024-07-25T08:55:51+5:30
उटाचे अध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी तानावडे यांचे अभिनंदन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यातील अनुसूचित जमातींना (एसटी) विधानसभेत आरक्षण मिळावे अशी मागणी करणारा मुद्दा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल राज्यसभेत मांडला.
गोव्याच्या सांस्कृतिक हेरिटेजमध्ये एसटींचे मोठे योगदान आहे. पण त्यांना कधीच विधानसभेत आरक्षण मिळाले नाही. गोवा विधानसभेत एसटींना आरक्षण न मिळाल्याने एसटी बांधवांच्या विकासावर परिणाम होत आहे. सरकारी धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत एसटींना राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून स्थान मिळायला हवे, असे तानावडे म्हणाले. गव्हर्नन्स सर्वसमावेशक होण्यासाठी एसटींना विधानसभेत आरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने संबंधित कायदा दुरुस्त करून एसटींना त्यांचा घटनात्मक अधिकार मिळवून द्यावा, अशी मागणी तानावडे यांनी केली.
दरम्यान, उटाचे अध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी तानावडे यांचे अभिनंदन केले. एसटींना विधानसभेत आरक्षण मिळावे म्हणून जी चळवळ अनेक वर्षे सुरू आहे, त्या चळवळीची आता चांगली फलश्रुती होईल. एसटींना विधानसभा मतदारसंघ आरक्षित करून मिळणे निश्चितच शक्य होईल, असे वेळीप 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.