विधानसभेत एसटी समाजाला राखीवता द्या: सरदेसाईंचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 10:31 AM2023-04-25T10:31:36+5:302023-04-25T10:31:54+5:30
विजय सरदेसाई यांनी केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांना पत्र.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) राखीवता दिली जावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून केली आहे.
सरदेसाई यांनी पत्रात असे म्हटले आहे की, विधानसभेत राजकीय आरक्षण हा गावडा, कुणबी, वेळीप आदी अनुसूचित जमातींच्या लोकांचा हक्क आहे. त्यांना तो त्वरित मिळवून देण्यासाठी योग्य ती प्रक्रिया सुरू करावी. यापूर्वी सरदेसाई यांनी आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत चर्चेस आणला होता. गोवा विधानसभेने एसटींना ४ मतदारसंघ राखीव ठेवण्याचा ठरावही घेतला होता. पण, नंतर त्याची कार्यवाही झालीच नाही, याकडे सरदेसाई यांनी या पत्रात लक्ष वेधले आहे.
सरदेसाई म्हणतात की, २०११ च्या जनगणनेनुसार गोव्यात एसटींची संख्या १०.३३ टक्के आहे. या समाजाला एसटी दर्जा मिळून २० वर्षे झाली, तरीही त्यांना अजून त्यांचा विधानसभेत राजकीय आरक्षणाचा हक्क मिळालेला नाही. २००६ मध्ये माजी आमदार आंतोन गावकर यांनी या आरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका निकाली काढताना न्यायालयाने याप्रकरणी ८ महिन्यांत सोक्षमोक्ष लावावा, असे निर्देश दिले होते. तरीही या आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही, याकडेही त्यांनी या पत्रात लक्ष वेधले आहे.
ही प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी ताबडतोब मतदारसंघ फेररचना आयोगाची स्थापना करावी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला तशी शिफारस करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"