गोव्यातही आता घर वापसी!
By admin | Published: February 28, 2015 02:01 AM2015-02-28T02:01:32+5:302015-02-28T02:02:48+5:30
पणजी : विश्व हिंदू परिषदेचे गोमंतकातही ‘घर वापसी’चे ध्येय आहे. गोव्यात पार्तुगिजांद्वारे हिंदू समाजातील लोकांचे धर्मांतर झाले होते.
पणजी : विश्व हिंदू परिषदेचे गोमंतकातही ‘घर वापसी’चे ध्येय आहे. गोव्यात पार्तुगिजांद्वारे हिंदू समाजातील लोकांचे धर्मांतर झाले होते. धर्मांतरामुळे ख्रिस्ती बनलेल्या लोकांना जर पुन्हा हिंदू धर्मात स्वेच्छेने यायचे असेल तर विश्व हिंदू परिषदेतर्फे दारे खुली करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सत्संग विभागाचे केंद्रीय मंत्री दादा वेदक यांनी पत्रकार परिषदेत केले.
वेदक पुढे म्हणाले, कोणत्याही धर्मातील व्यक्तीला हिंदू धर्मात आणण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. मात्र, स्वेच्छेने येणाऱ्या व्यक्तीला हिंदू शास्त्राप्रमाणे समाजात सामावून घेतले जाईल.
परिषदेचे स्वागताध्यक्ष श्रीनिवास धेंपे म्हणाले, वेदक यांच्या विधानावर मी कोणताही प्रतिसाद देणार नाही. विश्व हिंदू परिषदेतर्फे मडगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विराट हिंदू संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे आणि मी ती निभावणार आहे. मी स्वत: विश्व हिंदू परिषदेचा सदस्यही नसल्याचे धेंपो यांनी या वेळी सांगितले.
दादा वेदक म्हणाले, सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त मडगाव येथील फातोर्डा मैदानावर १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता विराट हिंदू संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी कणेरीमठ-कोल्हापूर येथील प.पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, पुष्पराज स्वामी, मुकुंदबुवा मडगावकर, बाळमहाराज, पूज्य स्वामी विज्ञानंद, ह.भ.प. मंगलाताई कांबळे, अशोकराव चौगुले, अॅड. दीपक गायकवाड, सुभाष वेलिंगकर उपस्थित असतील, असे वेदक यांनी सांगितले.
विश्व हिंदू परिषदेची स्थापना १९६४ साली झाली होती. या पन्नास वर्षांत परिषदेतर्फे कोणते कार्य करण्यात आले आणि यापुढे कोणते कार्य केले जाईल याचा आढावा या परिषदेत घेण्यात येणार आहे. गोमंतकात हिंदू धर्माप्रती सकारात्मक वातावरण आहे. येथे धार्मिक कार्य, संस्कार, संस्कृती यांची चांगल्या पद्धतीने जोपासना होत आहे. देवालयांच्या समित्यांशी विश्व हिंदू परिषदेतर्फे संपर्क साधून बाल संस्कार केंद्रे, गोरक्षण केंद्रे, प्रवचने, कीर्तने यांचे वारंवार आयोजन व्हावे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही वेदक म्हणाले.
(प्रतिनिधी)