गोव्यात भाजपा-मित्रपक्षांच्या २१ पैकी १४ आमदारांना पदे, खातेवाटप गुरुवारनंतर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:24 AM2019-03-20T06:24:30+5:302019-03-20T06:24:45+5:30
गोव्यात आपले सरकार यावे, यासाठी भाजपाने मित्रपक्ष व अपक्ष यांना एकूण ७ मंत्रिपदे द्यावी लागली आहेत. एकूण १२ जणांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे मुख्यमंत्र्यांसह केवळ पाचच मंत्री आहेत.
पणजी - गोव्यात आपले सरकार यावे, यासाठी भाजपाने मित्रपक्ष व अपक्ष यांना एकूण ७ मंत्रिपदे द्यावी लागली आहेत. एकूण १२ जणांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे मुख्यमंत्र्यांसह केवळ पाचच मंत्री आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत शपथविधीनंतर दिल्लीला जाणार असून, तिथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतरच खातेवाटप नक्की केले जाईल. तसेच मित्रपक्षांची खाती नक्की केली जातील.
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तिन्ही तर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या तीनपैकी दोघांना मंत्री करण्यात आले आहे. तसेच तीन अपक्षांपैकी दोघे मंत्री झाले आहेत. भाजपा व मित्रपक्ष यांचे मिळून २१ आमदार असून, त्यापैकी १२ जण याप्रकारे मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत याआधी विधानसभेचे अध्यक्ष होते. त्याजागी भाजपाचे राजेश पाटणकर यांची निवड अपेक्षित आहे. भाजपाचेच मायकेल लोबो उपाध्यक्ष आहेत.
म्हणजे एकूण १४ जणांना काही ना काही पदे मिळाली आहेत. त्यामुळे उरलेल्या सात आमदारांना
खूश ठेवण्यासाठी कदाचित
महामंडळे वा अशीच काही पदे दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गोव्यात महामंडळेही फारशी नाहीत. एक वेळ भाजपाच्या आमदारांची समजूत घालण्यात येईल. पण एक अपक्ष व गोवा फॉरवर्ड पक्षाचा एक अशा दोन आमदारांना महामंडळे मिळण्याची शक्यता आहे.
प्रमोद सावंतांची आज सत्वपरीक्षा
पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारला बुधवारी विधानसभेत सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागेल. ४0 सदस्यीय विधानसभेत सध्या ३६ आमदार आहेत. काँग्रेसकडे १४ आमदार असले तरी भाजपा व मित्रपक्ष, अपक्ष मिळून २१ आमदार आहेत. एक सदस्य सभापतीपदी असेल. बहुमतासाठी
१९ जणांची गरज आहे.