गोव्यात 2 टक्के गोमंतकीयांना कोरोनाची बाधा, 407 बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 08:15 PM2020-09-28T20:15:47+5:302020-09-28T20:15:58+5:30
गेल्या चोवीस तासांत 612 कोविडग्रस्त ठीक झाले असून, सक्रिय रुग्ण सध्या 4 हजार 917 आहेत.
पणजी : राज्यात कोविडमुळे आतापर्यंत एकूण 407 मृत्यू झाले आहेत. सोमवारी सहा जणांचा मृत्यू झाला. नवे 438 कोविडबाधित सोमवारी
आढळले. राज्यातील एकूण 2 टक्के लोकांना आतापर्यंत कोविडची बाधा झाली व त्यापैकी 27 हजार 72 व्यक्ती आजारातून ठीक झाल्या. 16 लाख लोकसंख्येच्या गोव्यात एकूण 2 लाख 51 हजार 33 व्यक्तींची गोव्यात कोविड चाचणी केली गेली. एकूण 32 हजार 396 व्यक्तींना कोविडची लागण झाली. गेल्या चोवीस तासांत 612 कोविडग्रस्त ठीक झाले असून, सक्रिय रुग्ण सध्या 4 हजार 917 आहेत. आजारातून ठीक झालेल्या व्यक्तींचे प्रमाण सोमवारी 83.56 टक्के राहिले.
साखळी रुग्णालय क्षेत्रात सध्या 365 तर वाळपई आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 209 कोविडग्रस्त आहेत. पर्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रत 405 कोविडबाधित आहेत. मडगावमध्ये संख्या 350 तर वास्कोत संख्या 295 आहे. धारबांदोडाला संख्या 114 आहे.
50 वर्षीय दोघे रुग्ण दगावले
दरम्यान, बस्तोडा- म्हापसा येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचे सोमवारी निधन झाले. तसेच हळदोणा येथीलही 50 वर्षीय रुग्णाचे कोविडने निधन झाले. खोर्ली म्हापसा येथील 64 वर्षीय तर वेर्ला काणका येथील 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोविडने बळी घेतला. सासष्टीतील 68 वर्षीय रुग्ण आणि सांगेतील 59 वर्षीय रुग्णाचा कोविडने बळी घेतला आहे. सहापैकी तीन रुग्ण गोमेकॉ इस्पितळात तर ईएसआय इस्पितळात एकटा मरण पावला. सांगेच्या आरोग्य केंद्रात एकाचा जीव गेला तर दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात एक रुग्ण मरण पावला. सांगेच्या आरोग्य केंद्रात रुग्णाला आणल्यानंतर 30 मिनिटांत त्याचा जीव गेला.