दक्षिण गोव्यात गांजाचा सुळसुळाट, 18 प्रकरणांत आतापर्यंत 20 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 06:14 PM2017-11-13T18:14:01+5:302017-11-13T18:15:03+5:30
आतापर्यंत उत्तर गोव्याच्या किनारपट्टी पुरताच मर्यादित असलेला ड्रग्स व्यवसाय दक्षिण गोव्यातही वाढला असून यंदा आतापर्यंत तब्बल 18 प्रकरणांची दक्षिण गोव्यात नोंद झाली असून त्यात एकूण 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
मडगाव : आतापर्यंत उत्तर गोव्याच्या किनारपट्टी पुरताच मर्यादित असलेला ड्रग्स व्यवसाय दक्षिण गोव्यातही वाढला असून यंदा आतापर्यंत तब्बल 18 प्रकरणांची दक्षिण गोव्यात नोंद झाली असून त्यात एकूण 20 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील बहुतेक प्रकरणो विदेशी पर्यटकांमध्ये मरीजुवाना तर देशी पर्यटकांमध्ये गांजा म्हणून प्रचलित असलेल्या अंमली पदार्थांचा जास्त समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी दक्षिण गोवा जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या मडगावपासून 7 कि.मी. अंतरावर असलेल्या दवर्ली येथे रात्रीच्यावेळी गांजाचे सेवन करताना मायणा कुडतरी पोलिसांनी कृष्णा पिल्ले व आदित्य मोहन या दोन युवकांना अटक केली होती. त्यांच्याकडे 5 हजाराचा गांजा सापडला होता. त्या आधी 7 नोव्हेंबरला मडगाव पोलिसांनी मोहनदास शेटकर या बस चालकाला अटक करुन त्याच्याकडून दहा हजाराचा गांजा जप्त केला होता.
सदर बसचालक बस चालविण्याच्या बहाण्याने गांजाही विकत होता हे पोलीस तपासात उघड झाले होते. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात दक्षिण गोव्यात एकूण अशा 14 प्रकरणांची नोंद झाली असली तरी आतार्पयत त्यापैकी केवळ 4 प्रकरणांतच आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणं 2012 पासून उत्तर गोव्यातील हे ड्रग्सचे लोण दक्षिण गोव्यातही पसरू लागले आहेत. 2012 ते 2017 या पाच वर्षाच्या कालावधीत दक्षिण गोव्यात एकूण 56 प्रकरणो नोंद झाली असून त्यात 61 जणांना अटक झाली होती.
यंदा सर्वात जास्त प्रकरणो मडगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाली असून एकूण 8 प्रकरणात मडगाव पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. त्यामागोमाग वास्कोत 5, काणकोणात 2 तर मायणा कुडतरी व केपे या पोलीस स्थानकाच्या हद्दीत प्रत्येकी एका प्रकरणाची नोंद झाली आहे. 2016 साली दक्षिण गोव्यात एकूण अशा 13 प्रकरणांची नोंद झाली होती. दक्षिण गोव्यात रेल्वेस्थानक परिसरात अशा प्रकरणांची अधिक नोंद झाली असून काही प्रकरणो शैक्षणिक संस्थांजवळही घडली आहेत. त्यामुळे विद्यालयीन विद्याथ्र्यातही हे अंमलीपदार्थ पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनीही अशा जागेवर आपले लक्ष केंद्रीत केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका:याने दिली.