गोवा : पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच 4 चार्टर विमाने रद्द, व्यावसायिक चिंतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 02:23 PM2018-10-18T14:23:11+5:302018-10-18T14:23:20+5:30
पर्यटन हंगामाच्या सुरवातीलाच चार चार्टर विमाने रद्द झाल्याने राज्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटन उद्योगांशी संबंधित अन्य घटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पणजी : पर्यटन हंगामाच्या सुरवातीलाच चार चार्टर विमाने रद्द झाल्याने राज्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटन उद्योगांशी संबंधित अन्य घटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या वर्षीच्या पर्यटन हंगामाच्या तुलनेत यंदा विदेशातून पर्यटकांना घेऊन येणा-या चार्टर विमानांची संख्या कमी असेल, असा होरा आधीच व्यावसायिकांनी बांधला होता. हंगामाच्या प्रारंभीच त्याची प्रचिती आली. गेल्या महिन्यात ३0 रोजी एक चार्टर विमान रद्द झाले तर चालू महिन्यात १८ चार्टर विमाने येणार होती त्यातील ३ रद्द झाली. महिनाअखेरपर्यंत आता केवळ १५ चार्टर विमानेच येतील.
टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवाचे अध्यक्ष सावियो मेसियश यांचे असे म्हणणे आहे की, इजिप्त आणि तुर्कीकडे पर्यटक वळू लागले आहे कारण गोव्यापेक्षा पर्यटकांना तेथे सफर करणे स्वस्त पडते. भौगोलिक व राजकीय कारणास्तव गेली काही वर्षे इजिप्तकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती परंतु आता ते या देशाकडे वळू लागले आहेत. गोवा सरकारने चार्टर विमानांना शक्य तेवढ्या अधिक सवलती द्यायला हव्यात, अशी मागणी आम्ही नेहमीच करीत असतो. परंतु सरकारकडून याबाबतीत काही प्रतिसाद मिळत नाही.
अन्य एका पर्यटन व्यावसायिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हिएतनाम आणि थायलँड या देशांमध्येही पर्यटन बहरु लागले आहे त्याचा परिणाम गोव्याच्या पर्यटनावर होत आहे. शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी पर्यटक घटल्यास त्याचा मोठा परिणाम शॅक व्यवसायावरही होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, यंदा सरकारने शुल्क ५ हजार रुपयांनी वाढविले आहे. ही वाढ धोरणानुसार असली तरी व्यावसायिकांना तशी परवडत नाही. १८ बाय ८ मिटर जागेसाठी गेल्यावर्षी ६0 हजार शुल्क पर्यटन खात्याने घेतले होते. यंदा ५ हजार रुपयांनी ते वाढविण्यात आले आहे. आधीच व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे त्यात पर्यटक न फिरकल्यास त्याचा मोठा आर्थिक परिणाम व्यवसायावर होईल.
पर्यटन खात्याकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार गेल्या वर्षी पर्यटक हंगामात ९८१ चार्टर विमाने आली आणि त्याव्दारे २ लाख ४७ हजार ३६५ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. त्यात रशियन पर्यटकांचा भरणा जास्त होता. इंग्लंड, युक्रेन, कझाकीस्तानमधूनही चार्टर विमाने येतात.