गोवा : ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत सागरी कासवाने घातली ९८ अंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 05:55 PM2023-12-31T17:55:49+5:302023-12-31T17:56:13+5:30
समुद्री कासव किनारी भागात येऊन मऊ वाळूमध्ये खड्डा खोदते आणि त्यात आपली अंडी घालून निघून जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : गेल्या काही काळापासून वाढलेला ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत अखेर मोरजी किनाऱ्यावर टेमवााडा परिसरात एका सागरी कासवाने ९८ अंडी घातली आहेत. बुधवारनंतर कासवाने अंडी घातल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोरजी पंचायत क्षेत्रातील टेंबवाडा परिसरात १९९७ पासून कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सन २००० मध्ये पाचशे चौरस मीटर जमीन कासव संवर्धन मोहिमेसाठी आरक्षित केली. आजपर्यंत याठिकाणी कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते. आश्वे किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात समुद्र कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. हे दोन्ही किनारे समुद्री कासवांसाठी प्रसिद्ध आहेत. या दोन्ही किनाऱ्यांना महत्त्व असल्याने ते संवेदनशील किनारी म्हणून जाहीर केलेले आहेत. स्थानिक नागरिक, पर्यटन हंगामातील शॅक्स व्यावसायिक आणि सरकारच्या वन्य विभागामार्फत ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे.
समुद्री कासव किनारी भागात येऊन मऊ वाळूमध्ये खड्डा खोदते आणि त्यात आपली अंडी घालून निघून जाते. निसर्ग प्रक्रियेनुसार ५० ते ५२ दिवसांनी अंड्यातून आपोआप पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले बाहेर पडल्यानंतर रात्री समुद्राच्या चकाकणाऱ्या पाण्याच्या दिशेने आपोआप निघून जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ध्वनी प्रदूषण वाढले आहे. किनारी भागात सर्वत्र लखलखणारे दिवे, विद्युत रोषणाई दिसते. त्यामुळे वन्य विभागाचे कामगार पिल्लांना समुद्रात सोडतात.