गोवा : भररस्त्यावर चौघांनी एका तरुणाचा हत्याराने सपासप वार करून केला निर्घृण खून  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 11:23 PM2022-09-05T23:23:11+5:302022-09-05T23:24:19+5:30

दोन वर्षापासून उमेश आणि त्या गटातील काहींची दुश्मनी असल्याचे पोलिसांना प्रथम चौकशीत समजले.

Goa A young man was brutally stabbed to death by four people on the highway | गोवा : भररस्त्यावर चौघांनी एका तरुणाचा हत्याराने सपासप वार करून केला निर्घृण खून  

गोवा : भररस्त्यावर चौघांनी एका तरुणाचा हत्याराने सपासप वार करून केला निर्घृण खून  

googlenewsNext

वास्को: आपल्या मित्रासहीत काटे बायणा, वास्को येथे सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या ३३ वर्षीय उमेश हरीजन याचा चौघांनी अडवून त्याच्यावर सुरा, कोयता आणि इतर हत्यारांनी सपासप वार करून हत्या केली. उमेशची हत्या करून फरार झालेल्या आरोपींपैंकी दोघजण दुचाकीने ओल्ड गोवाच्या दिशेने जात असल्याची माहिती फोंडा पोलीसांना मिळताच त्यांनी त्यांचा पाठलाग करून बाणस्तारी मार्गावर पकडून मुरगाव पोलीसांच्या ताब्यात दिले. दोन वर्षापासून उमेश आणि त्या गटातील काहींची दुश्मनी असल्याचे पोलिसांना प्रथम चौकशीत समजले असून पूर्व वैमानस्यातून त्या चौघांनी उमेशचा खून केल्याचे चौकशीत जाणवले.

सोमवारी (दि.५) दुपारी ३.३० वाजता दक्षिण गोव्यातील काटे बायणा भागात थरकाप उडवणारी ही घटना घडली. काटे बायणा येथे राहणारा उमेश हरीजन आणि त्याचा मित्र अशोक चलवाडी त्या परिसरात सार्वजनिक गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेऊन दोघेही जण परतताना हत्यारासहीत तेथे आलेल्या चौघांनीही उमेश आणि अशोक यांना अडवून काटे बायणा येथील उड्डाणपूलाच्या खालच्या भागात घेऊन आले. त्यानंतर त्यांनी उमेशशी वाद घालण्यास सुरुवात करून एकाने त्याच्यावर लाथ मारण्याबरोबरच हत्याराने पाठीवर हल्ला केला. तसेच नंतर त्याच्यावर हत्याराने सपासप हल्ले करण्यास सुरवात केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हल्ला होताना पाहून अशोकने उमेशला वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र त्याचौघांनी अशोकवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो काही अंतरावर पळून त्यांने उमेशच्या नातेवाईकांना घटनेची माहीती दिली. उमेश रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्यानंतर त्या चारही हल्लाखोरांनी वाहनासहीत पोबारा केला. उमेशला त्वरित उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

फरार झालेल्या आरोपीपैंकी दोघेणज दुचाकीने ओल्ड गोवाच्या मार्गाने जात असल्याची माहीती फोंडा पोलीसांना मिळाली. पोलीस उपअधीक्षक सी एल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलीस त्या आरोपींच्या मागावर लागून त्यांनी त्या आरोपींची दुचाकी बाणस्तारी येथे अडवून दोघांनाही ताब्यात घेतले. उमेशच्या खून प्रकरणात ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयित हल्लेखोरांची नावे अमीर हुसैंन आणि दिपक सहानी अशी असून दोघांचे वय सुमारे ३० असल्याची माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली. उमेशचा खून करून पोबारा केलेल्या आणि अजून पोलीसांना सापडू शकले नसलेल्या अन्य दोन हल्लेखोरांची नावे जुम्मन आणि परशुराम उर्फ परश्या अशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पूर्व वैमानस्यातून हत्या
उमेशचा खून पूर्व वैमानस्यातून केल्याचे पोलीसांना चौकशीतून समोर आले. उमेश आणि त्याची हत्या केलेल्यापैंकी काहींची दोन वर्षापासून काही कारणामुळे दुश्मनी होती. दोन वर्षापूर्वी उमेश आणि त्या गटातील काहीजणांत मारामारी झाली होती अशी माहिती उमेशच्या परिचयातील एकाने दिली.  

Web Title: Goa A young man was brutally stabbed to death by four people on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.