गोव्याने पहिला डोस देण्याचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठले; PM मोदींनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 05:37 AM2021-09-12T05:37:55+5:302021-09-12T05:39:55+5:30
कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याच्या बाबतीत शंभर टक्के उद्दिष्ट गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा सरकारचे अभिनंदन केले आहे.
पणजी : कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याच्या बाबतीत शंभर टक्के उद्दिष्ट गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा सरकारचे अभिनंदन केले आहे. ट्विटमध्ये मोदी यांनी ‘वेल डन गोवा, ग्रेट एफर्ट,’असे म्हटले असून या यशाबद्दल कौतुक करताना सामूहिक स्फूर्ती आणि डॉक्टरांचे, तसेच संशोधकांचे कसब यामुळे हे शक्य झाले, असेही नमूद केले आहे. १६ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात १८ वर्षे वयावरील ११ लाख ६२ हजार ४६ लोकांनी पहिला डोस घेतलेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याने पहिला डोस पूर्ण केल्याचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठल्याचे ट्विट केले होते.