Goa : बेकायदेशीर वास्तव्य करणा-या विदेशींवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 11:54 AM2018-10-12T11:54:09+5:302018-10-12T11:55:41+5:30
पर्यटन व्यवसायाबरोबर वाढत्या गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर गोव्यात खास करुन बार्देस तालुक्यातील किनारपट्टी भागातील वाढत्या गुन्हगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून पावले उचलण्यात येत आहे.
म्हापसा : पर्यटन व्यवसायाबरोबर वाढत्या गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर गोव्यात खास करुन बार्देस तालुक्यातील किनारपट्टी भागातील वाढत्या गुन्हगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून पावले उचलण्यात येत आहे. खास करुन पोलीस खात्यात योग्य प्रकारे नोंदणी न करता बेकायदेशीरपणे वास्तव्य करणा-या विदेशी नागरिकांविरोधात तसेच त्यांना आश्रय देणा-या स्थानिकांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहे.
उत्तर गोव्यात खास करुन कळंगुट, वागातोर हणजूण सारख्या किनारी भागात बरेच विदेशी नागरिक वास्तव्य करुन राहतात. पर्यटन हंगाम सुरु झाला की दीर्घ मुदतीवर वास्तव्य करुन राहण्यासाठी ते गोव्यात येत असतात. पाश्चिमात्य देशातील नागरिकाबरोबर नायजेरियन नागरिकांचासुद्धा त्यात मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. येणारे पर्यटक पर्यटन व्हिसा किंवा काही व्यावसायिक तसेच शैक्षणिक व्हिसावर भारतात येऊन राहतात. त्यातील बरेच नागरिक कायदेशीर सोपस्कर पूर्ण करतात; पण बरेच नागरिक दाखल होताना केलेले सोपस्कार पूर्ण करण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींना बगल देतात.
त्यातील काही वास्तव्याची मुदत संपून सुद्धा बेकायदेशीरपणे ते वास्तव्य करुन राहतात. यात नायजेरियन नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. बेकायदेशीर वास्तव्या सोबत अनेक बेकायदेशीर कृत्य करतात. रात्री अपरात्रीपर्यंत धिंगाणा घालणे, दंगामस्ती करणे, अमली पदार्थासारख्या गैरव्यवहारात सुद्धा ते गुंतलेले असतात. पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी त्यांना गुंगारा देवून ते बिनधास्तपणे फिरत असतात.
अवघ्या पैशांच्या हवासापोटी अशा बेकायदेशीर नागरिकांना स्थानिकांचे समर्थन लाभलेले असते. त्यांना राहण्यासाठी घरे देताना स्वत:ची वाहने सुद्धा भाड्याने दिली जातात. घरे भाड्यासाठी देताना सी फॉर्मवर त्याची स्थानिक पोलीस स्थानकात नोंदणी करणे आवश्यक असते; पण कागदपत्रांच्या अभावापायी त्यांची साहाय्यता करुन ही प्रक्रिया पूर्ण न करता त्यांची मदत करतात. अप्रत्यक्षपणे त्यांची साहाय्यता ते करतात.
अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई करण्याचे संकेत कळंगुट पोलिसांकडून देण्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वी कळंगुट पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करुन राहणाºया नायजेरियनाला अटक केली होती तसेच त्याला सहकार्य करणा-या स्थानिकांवर सुद्धा गुन्हा नोंद केला होती. यापुढे अशा प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्त पावले उचलण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.