Goa: म्हापशात अतिक्रमणावर कारवाई
By काशिराम म्हांबरे | Published: May 11, 2023 03:44 PM2023-05-11T15:44:49+5:302023-05-11T15:45:04+5:30
Goa: म्हापसा शहरात खाद्य पदार्थासाठी प्रसिद्ध असलेल्या अलंकार थेटराजवळील गाडेधारकांनी केलेल्या अतिक्रमणावर तसेच शहरातील इतर भागातील अतिक्रमणावर नगरपालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली.
- काशीराम म्हांबरे
म्हापसा शहरात खाद्य पदार्थासाठी प्रसिद्ध असलेल्या अलंकार थेटराजवळील गाडेधारकांनी केलेल्या अतिक्रमणावर तसेच शहरातील इतर भागातील अतिक्रमणावर नगरपालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय संरक्षण मंत्री कै. मनोहर पर्रीकर यांचे हे अत्यंत आवडीचेअसे ठिकाण होते.
उत्तर गोवा जिल्हाधिकाºयाने जारी केलेल्या अधिसुचनेच्या पार्श्वभुमीवर म्हापसा नगरपालिकेने रस्त्याच्या कडेला असलेल्या बेकायदेशीर विक्रेत्यांवर, होर्डिंग्जवर शहरात धडक कारवाई केली. धडक मोहिमेतून फुटपाथ तसेच रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाºयांवर ही कारवाई केली. बुधवार पासून सुरु झालेली ही मोहिम गुरुवारी सुद्धा सुरुच होती.
शहरातील या अतिक्रमणामुळे पादचाºयांना वाहन चालकांना बराच त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांकडून या संबंधीच्या तक्रारी सुद्धा दाखल केल्या होत्या. यात अलंकार थेटरजवळील परिसराचा सुद्धा समावेश होता. ही मोहिम मुख्याधिकारी आमीतेश शिरवईकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके निरीक्षक तसेच नगरपालसिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या या मोहिमेत ५ ट्रकाहून जास्त सामान जप्त करण्यात आले. आज गुरुवारी सुद्धा सामान जप्त करण्यात आले. मोहिमेसाठी दोन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे शिरवईकर म्हणाले. प्रत्येक पथकात दोन निरीक्षक तसेच १० कामगारांचा समावेश करण्यात आला आहे. मोहिम सुरु करण्यापूर्वी त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या. याच मोहिमेचा एक भाग म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या म्हापशातील बाजारातही मोहिम हाती घेतली जाणार आहे