गोवा : नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस उपनगराध्यक्ष पदाची माळ रामचंद्र कामत यांच्या गळ्यात
By पंकज शेट्ये | Published: April 25, 2023 06:17 PM2023-04-25T18:17:32+5:302023-04-25T18:17:50+5:30
मंत्री मावीन, आमदार कृष्णा आणि संकल्प यांनी केली मध्यस्थी
वास्को: मुरगाव नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत नगरसेवक विनोद कीनळेकर यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतल्याने रामचंद्र कामत यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष पदी निवड झाली. नगरसेवक विनोद कीनळेकर आणि रामचंद्र कामत दोघेही भाजपचे समर्थक असून उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होणार काय अशी चर्चा होत होती. मात्र निवडणूकीची बैठक सुरू होण्यापूर्वी मंत्री मावीन गुदिन्हो, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी बहुतेक नगरसेवकांना एकत्रित घेऊन चर्चा केल्यानंतर विनोद कीनळेकर यांना निवडणूकीतून माघार घेण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांने उपनगराध्यक्ष पदासाठी घातलेला अर्ज मागे घेतला.
काही दिवसापूर्वी अमेय चोपडेकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी मंगळवारी (दि.२५) बैठक बोलवली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विनोद कीनळेकर आणि रामचंद्र कामत यांचे अर्ज दाखल झाले होते. उपनगराध्यक्षासाठी रिंगणात उतरलेले दोघेही नगरसेवक भाजपचे असल्याने भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होणार काय अशी चर्चा होत होती. भाजप विरुद्ध भाजप लढत न होता उपनगराध्यक्ष बिनविरोध निवडण्यासाठी भाजप नेत्यांकडून हालचाली होणार अशी चर्चा होत होती.
मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता मुरगाव नगरपालिकेच्या सभागृहात उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी बैठकीला सुरवात झाली. बैठकीला मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित होते तर त्यांच्याबरोबर मुरगावचे मुख्याधिकारी जयंत तारी उपस्थित होते. बैठक सुरू करण्यासाठी नगरसेवकांची लागणारी संख्या (कोरम अभावी) कमी असल्याने निर्वाचन अधिकारी भगवंत करमळी यांनी बैठक पुढे ढकलून दुपारी १२ वाजता सुरू करण्याचे घोषित केले. त्यानंतर दुपारी १२ वाजता नगरसेवकांची संख्या कमी असल्याने बैठक आणखीन १५ मिनिटासाठी पुढे ढकलण्यात आली. त्याच दरम्यान मंत्री मावीन गुदिन्हो, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर यांनी उपनगराध्यक्षासाठी अर्ज भरलेले नगरसेवक विनोद कीनळेकर आणि रामचंद्र कामत यांच्यासहीत बहुतेक नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. रामचंद्र कामत यांना बहुतेक नगरसेवकांचा पाठींबा असल्याचे दिसून आल्यानंतर मंत्री गुदिन्हो आणि इतरांनी कीनळेकर यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले असता त्यांनी ते मान्य केले.
१२.१५ वाजता उपनगराध्यक्ष निवडीच्या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर कीनळेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. कीनळेकर यांनी अर्ज माघे घेतल्याने निर्वाचन अधिकारी भगवंत करमळी यांनी रामचंद्र कामत यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष पदावर निवड झाल्याचे घोषित केले. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप समर्थन असलेल्या दोन नगरसेवकांनी अर्ज भरल्यानंतर निर्माण झालेल्या नाट्यमय घडामोडी कीनळेकर यांनी अर्ज मागे घेऊन कामत यांना उपनगराध्यक्ष म्हणून घोषित केल्यानंतर संपुष्टात आल्या. मुरगावच्या उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप लढत होऊनये यासाठी मंत्री मावीन गुदिन्हो, आमदार कृष्णा साळकर आणि आमदार संकल्प आमोणकर यांनी पुढाकार घेतल्यानंतर अखेरीस त्यात त्यांना यश प्राप्त झाले.