गोवा पुन्हा किलर स्टेट बनतेय ? अपघात, हत्या आणि बुडून मरणेही सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 01:56 PM2017-10-03T13:56:19+5:302017-10-03T13:56:42+5:30
हिरवागार निसर्ग, मनमोहक पर्यटन आणि शेकडो वर्षे चालत आलेला जातीय व धार्मिक सलोखा लाभलेले गोवा राज्य पुन्हा एकदा किलर स्टेट बनू लागले की काय असा प्रश्न अनेक जाणकारांना पडू लागला आहे.
पणजी : हिरवागार निसर्ग, मनमोहक पर्यटन आणि शेकडो वर्षे चालत आलेला जातीय व धार्मिक सलोखा लाभलेले गोवा राज्य पुन्हा एकदा किलर स्टेट बनू लागले की काय असा प्रश्न अनेक जाणकारांना पडू लागला आहे. वाहन अपघातांची मालिका गोव्यात सुरूच आहे आणि पर्यटनस्थळी बुडून मृत्यू येण्याचे प्रकारही थांबलेले नाहीत. हत्येच्या घटनाही सुरू आहेत.
गोवा राज्य हा शांत प्रदेश असल्याचे मानले जाते पण या राज्यात अनैसर्गिक पद्धतीने मरणार्यांचे प्रमाण खूप चिंताजनक बनू लागले आहे. गेल्या पंधरवड्यातील विविध गावांमध्ये एकूण चौघा विवाहितांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी दोन घटना फोंडा व सत्तरी तालुक्यातील आहेत. राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्यात आत्महत्यांबाबत सरासरी प्रमाण जास्त आहे. दर 72 तासांत एक आत्महत्या होते.
गेल्या दोन दिवसांत गोव्यात वाहन अपघातात तिघांचे बळी गेले आहेत. शिवाय अन्य दोन अपघातांमध्ये दोघे गंभीर जखमी झाले. दर 48 तासांत वाहन अपघातात गोव्यात एकाचा मृत्यू होतो. काहीवेळा यात पर्यटकांचाही समावेश असतो. गेल्या दहा दिवसात अपघातांत पाचजणांना मृत्यू आला असून त्यात दोघा मजुरांचा समावेश आहे. जानेवारी 2017 ते मार्च 2017 या पहिल्या तीन महिन्यांत गोव्यात एकूण 80 व्यक्तींचा मृत्यू वाहन अपघातात झाला आहे.
गोव्यातील समुद्रात आणि धबधब्यासारख्या पर्यटन स्थळी पर्यटकांना किंवा स्थानिकांना बुडून मृत्यू येऊ नये म्हणून सरकार उपाययोजना करू लागले आहे. मात्र बुडून मृत्यू होण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. गेल्या शनिवारी हरवळे धबधब्यावर झालेल्या 26 वर्षीय इसमाच्या मृत्यूनंतर पर्यटन खातेही हतबल झाले आहे. हत्येच्या घटनाही अधूनमधून घडत आहेत. गेल्या 12 वर्षांत गोव्यात 245 पर्यटकांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. यात काही हत्यांचा समावेश आहे.