गोवा आणि महाराष्ट्र सांस्कृतिक जडणघडणीत देशात मॉडल म्हणून काम करतील: सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2022 08:27 PM2022-11-06T20:27:15+5:302022-11-06T20:27:55+5:30
गोवा आणि महाराष्ट्र सांस्कृतिक सेल स्थापन करणार
फोंडा: गोवा व महाराष्ट्र यांच्यामधल्या सांस्कृतिक दुव्यासंबंधी आमची मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे. संस्कृतीत जडणघडणीत ही दोन्ही राज्ये देशात मॉडेल म्हणून काम करतील. पथदर्शी म्हणून आदर्श निर्माण करतील. गोवा व महाराष्ट्र सांस्कृतिक सेलची स्थापना करण्याचा आमचा मानस आहे. त्याजोगे आम्ही आमची नाट्य संस्कृती जगात अजरामर करू.' असा विश्वास महाराष्ट्राचे कला व संस्कृती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ यंदा फोंड्यात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय गोखले, कला व संस्कृती विभागाचे उपसचिव विजय थोरात, कला व संस्कृती खात्याचे संचालक विभीषण चवरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. गोव्यातील रुद्रेश्वर संस्थेने सादर केलेले पालशेतची विहीर हे नाटक महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम आल्याने परंपरेचा मान म्हणून यंदा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गोव्यात होत आहे.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की 'संस्थेला किंवा कलाकाराला पुरस्कार प्राप्त होतो त्यावेळी त्याच्यावर मोठी जबाबदारी येते. येणाऱ्या पिढीसमोर आदर्श निर्माण करतानाच काल काय केले त्यापेक्षा उत्तुंग सादर करण्याचे आव्हान पेलावे लागते. कोणता देश किती धनसंपन्न आहे यावरून त्या देशाचे मूल्यांकन करण्याची मानसिकता चुकीची आहे. कारण धनाने संसाधनाची व्यवस्था करता येते परंतु मनाच्या समाधानाचे मूल्यांकन करताना धनापेक्षा 'हॅपीनेस इंडेक्स' महत्त्वाचा ठरतो आणि तो इंडेक्स फक्त भौतिक साधनातून निर्माण होत नाही,तर सांस्कृतिक संचिता मधूनच निर्माण होत असतो. मराठी म्हणजे महाराष्ट्र व गोवा हे समीकरण जुळवताना इथे असलेल्या कलाकारांना योग्य ते व्यासपीठ निर्माण करायचे आहे. त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न होत राहणार आहे.
गोव्याला नाटकाची फार मोठी परंपरा आहे. नाट्यवेड्या माणसाच्या बाबतीत गोवा देशात पहिल्या पाचात येईल, एवढे नाट्यरसिक ह्या पवित्र मातीत आहेत .गोव्यात खेडोपाडी अजूनही असंख्य नाटके होतात. पोर्तुगीजांच्या राजवटीत ह्याच नाटकानी मनोरंजन बाजूला ठेवून देश प्रेमाची चिंगारी पेटवण्याचे काम केले. नाटकाच्या विरतेच्या संघर्षातून पोर्तुगीज सत्ता नष्ट करण्याची इच्छा गोवेकरी जनतेत आला.