गोवा : शिक्षिकेच्या बदलीमुळे संतप्त सरपंच, पालकांची शिक्षण खात्यावर धडक
By समीर नाईक | Published: March 12, 2024 04:48 PM2024-03-12T16:48:13+5:302024-03-12T16:50:25+5:30
शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. त्यानंतर तातडीने शिक्षक नियुक्तीबाबत आदेश देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : मांद्रे-नाईकवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षिकेची ऐन परीक्षेच्या वेळी बदली केल्याने, गेले आठवडाभर शाळेत केवळ मुख्याध्यापकच उरले. मुलांना केवळ त्यांच्या उपस्थितीत शिकावे लागल्याने संतप्त झालेल्या मांद्रे पंचायतीचे सरपंच प्रशांत नाईक व पालकांनी मंगळवारी शिक्षण खात्यावर धडक दिली. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. त्यानंतर तातडीने शिक्षक नियुक्तीबाबत आदेश देण्यात आले.
सरपंच प्रशांत नाईक यांनी सांगितले की, परीक्षा तोंडावर असताना, गेले सात दिवस मुलांना शिक्षकांशिवाय राहावे लागत आहे. त्याचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. ही गोष्ट लक्षात येताच मी, विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन शिक्षण संचालकांची भेट घेतली. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेत लगेचच नवीन शिक्षक नियुक्त करण्याचा आदेश जारी केला. त्यामुळे गुरुवारपर्यंत नवीन शिक्षक येथे रुजू होणार आहेत.’
सरपंच नाईक म्हणाले की, ‘नाईकवाडा येथील या सरकारी शाळेत सुमारे ३२ विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे एक मुख्याध्यापक व एक शिक्षक कार्यरत आहे. पण, काही दिवसांपासून मुख्याध्यापकच मुलांना शिकवत आहेत. त्यांच्यावरदेखील अतिरिक्त भार आलेला आहे. शाळेची इतर कामे करायची की मुलांना शिकवायचे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत आमदार जीत आरोलकर यांच्याशीदेखील बोलणे झाले असून, त्यांनीदेखील आम्हाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षण संचालकांनी त्वरित आदेश जारी केला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो.’