गोवा : पत्नी-सासूच्या खून प्रकरणी अनुरागसिंग रजावत याला अटक

By पंकज शेट्ये | Published: January 6, 2024 04:15 PM2024-01-06T16:15:52+5:302024-01-06T16:16:32+5:30

हुंड्यासाठी सिलिंडर स्फोट घडवून दोघींचा जीव घेतल्याचा ठपका

Goa Anurag Singh Rajawat arrested in case of murder of wife mother in law | गोवा : पत्नी-सासूच्या खून प्रकरणी अनुरागसिंग रजावत याला अटक

गोवा : पत्नी-सासूच्या खून प्रकरणी अनुरागसिंग रजावत याला अटक

वास्को: ४८ दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरला गळती होऊन झालेल्या स्फोटात मृत पावलेल्या गर्भवती शिवानी रजावत (वय २६) व तिची आई जयदेवी चव्हाण यांच्या प्रकरणात वास्को पोलीसांनी शिवानीचा पती अनुरागसिंग रजावत विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला शुक्रवारी (दि.५) उशिरा रात्री अटक केली. काही दिवसापूर्वी पोलीसांनी शिवानीच्या मृत्यू प्रकरणात हुंडाबळीचा (भादस ३०४ बी) गुन्हा नोंद करून त्याप्रकरणात चौकशीला सुरुवात केली होती. शुक्रवारी पोलीसांनी अनुरागसिंग विरुद्ध शिवानी आणि तिची आई जयदेवी चव्हाणचा खून केल्याच्या आरोपाखाली ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद केल्याची माहीती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.

१८ नोव्हेंबरला सकाळी तो स्फोट झाला होता. नवेवाडे येथील जय संतोषी माता मंदिरामागील नील पार्वती इमारतीच्या पहील्या मजल्यावर शिवानी राजावत तिचे पती अनुरागसिंग आणि काही दिवसापूर्वी तेथे आलेली तिची आई जयदेवी सोबत राहायची. गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात शिवानी आणि जयदेवी यांचा मृत्यू झाल्यानंतर शुभमसिंग चव्हाण यांनी त्याची बहिण आणि आईच्या मृत्यू मागे घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तसेच त्यांनी बहिण शिवानी आणि आई जयदेवी यांचा षडयंत्र रचून त्यांची हत्या केल्याचा आरोप करून त्याबाबत लेखी तक्रार पोलीसांना दिली होती.

शिवानी आणि जयदेवी यांची हत्या शिवानीचे पती अनुरागसिंग यांनी केल्याचा दाट संशय शुभमने व्यक्त केला होता. हुंड्याच्या मुद्यावरून आणि अन्य विषयावरून बहिण शिवानी आणि आई जयदेवी यांची हत्या केल्याचा संशय शुभमसिंग यांनी व्यक्त केला होता. शिवानीचा मृत्यू विवाहाच्या सात वर्षाच्या आत झाल्याने मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी त्याप्रकरणात चौकशी करित होते तर जयदेवीच्या मृत्यू प्रकरणात वास्को पोलीस चौकशी करित आहेत. शिवानीच्या मृत्यू प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून नंतर त्याचा अहवाल पोलीसांना सादर केला. तसेच त्यांनी शिवानीच्या मृत्यू प्रकरणात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे योग्य चौकशी करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. त्यानंतर पोलीसांनी चौकशी करून २३ डिसेंबरला शिवानीच्या मृत्यू प्रकरणात तिचा पती अनुरागसिंग रजावत विरुद्ध हुंडाबळीचा ठपका ठेवत त्याच्याविरुद्ध भादस ३०४ बी कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.

शुक्रवारी उशिरा रात्री पोलीसांनी शिवानी आणि तिची आई जयदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात अनुरागसिंग रजावत विरुद्ध भादस ३०२ हा खूनाचा गुन्हा नोंद केल्याची माहीती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. शिवानी आणि जयदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशीवेळी अनुरागसिंग रजावत योग्यरित्या सहकार्य करत नसल्याने त्याच्यावर कारवाई करून त्याला शुक्रवारी उशिरा रात्री अटक केल्याचे पोलीस निरीक्षक नायक यांनी सांगितले. तसेच शिवानीच्या मृत्यू प्रकरणात अनुरागसिंग रजावत याच्याबरोबरच त्याची आई (शिवानीची सासू) साधनासिंग रजावत हीच्याविरुद्ध हुंडाबळीचा ठपका ठेवून भादस ३०४ बी कलमाखाली गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. शिवानी आणि तिची आई जयदेवी यांच्या खूनाच्या प्रकरणात अटक केलेला अनुरागसिंग रजावत हा भारतीय नौदलाचा कर्मचारी असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.

Web Title: Goa Anurag Singh Rajawat arrested in case of murder of wife mother in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा