गोव्यात कोंकणीपेक्षा मराठीतून अर्ज दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 07:04 PM2018-08-01T19:04:37+5:302018-08-01T19:19:04+5:30
वर्षभरात विविध कार्यालयात मराठीतून ३७२ अर्ज तर कोंकणीतून अर्ज करणाऱ्यांची संख्या १३५ एवढीच आहे.
पणजी: गोव्याची कोंकणी ही राजभाषा असली आणि संवादासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी भाषा असली तरी सरकारी कार्यालयात अर्ज करण्यासाठी कोंकणीपेक्षा मराठीचा अधिक वापर होत असल्याचे आढळून आले आहे. वर्षभरात विविध कार्यालयात मराठीतून ३७२ अर्ज तर कोंकणीतून अर्ज करणा-यांची संख्या १३५ एवढीच आहे.
गोवा विधानसभेत कॉंग्रेसचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती उघड झाली. राज्यातील सर्व ५३ खात्यातील सर्व कार्यालयात अर्ज करणा-यात इंग्रजीतून अर्ज करणा-यांची संख्या अजूनही फार मोठी आहे. इंग्रजी नंतर मराठीतून अर्ज करणा-यांची संख्या सर्वात मोठी आहे. कोंकणीतून अर्ज करणा-यापेक्षा दुप्पट अर्ज मराठीतून आले आहेत. १३५ अर्ज कोंकणीतून तर ३७२ अर्ज हे मराठीतून आहेत असे उत्तरात म्हटले आहे.
मराठीतून अर्ज कला आणि संस्कृती खात्यात अधिक आले आहेत. मराठीतून २०५ तर कोंकणीतून ४४ अर्ज करण्यात आले आहेत. त्यानंतर क्रमांक माहिती आणि प्रसिद्धी खात्याचा लागतो. या खात्यात मराठीतून ११० अर्ज तर कोंकणीतून ४७ अर्ज आले आहेत. कोंकणीतून सर्वाधिक अर्ज मिळण्याचे एकमेव खाते म्हणजे गोवा राजभाषा संचालनालय. या खात्याला ३९ अर्ज कोंकणीतून तर १० अर्ज मराठीतून आले आहेत.