Goa Assembly Election: गोव्यात बहुमत मिळालं नाही तर भाजप काय करणार? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केली घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:30 PM2022-03-08T16:30:51+5:302022-03-08T16:32:05+5:30
गेल्या वेळी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या आणि तो राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, ऐनवेळी 13 जागा जिंकलेल्या भाजपने मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले होते...
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल (Goa Assembly Election Result) जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच, बहुमत मिळाले नाही, तर भाजप काय करणार, यासंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मंगळवारी भाष्य केले. सावंत म्हणाले, जर भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिला तर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे (MGP) समर्थन मागण्यासंदर्भात पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आधीपासूनच चर्चा करत आहे. गोव्यात 40 सदस्यीय विधान सभेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झाले आणि 10 मार्चला निकाल घोषित होणार आहे.
बहुमत न मिळाल्यास भाजपचा 'प्लॅन' तयार -
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, भाजपला बहुमताचा आकडा असलेल्या 21 जागांपेक्षाही अधिक जागा मिळतील, अशी आशा पक्षाला आहे. मात्र, संख्याबळ कमी राहिल्यास, ‘पक्षाने अपक्ष आणि एमजीपीकडे समर्थन मागण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे.’ तसेच, भाजपचे केंद्रीय नेतृत्व निवडणुकीनंतर, युतीसाठी एमजीपीसोबत चर्चा करत आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
गेल्यावेळीही भाजपने स्थापन केले होते अल्पमताचे सरकार -
गेल्या वेळी म्हणजेच 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या आणि तो राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, ऐनवेळी 13 जागा जिंकलेल्या भाजपने एमजीपी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष यांच्या बरोबर युती करून मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले होते.
असा आहे गोव्याचा एक्झिटपोल -
गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये जबरदस्त फाईट बघायला मिळत आहे. येथे सर्वाधिक मते भाजपला मिळतील, असे आज तक- अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतो. भाजपला 33 टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेसला त्या खालोखाल 32 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. मात्र असे असले तरी, या विधानसभा निवडणुकीत कांग्रेसलाच सर्वाधिक जागा मिळत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसला 15 ते 20 जागा, तर भाजपला 14 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. गोव्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी २१ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
याच पद्धतीने टीव्ही नाईन भारतवर्ष-पोलस्ट्रेटने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 17 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 11 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यात आपला 1-4 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 2-7 जागा मिळण्याची शक्यता आहे.