Goa Assembly Election Results 2022: गोव्यात अमित शहा पुन्हा सक्रीय; काँग्रेसनेही मगोपशी संपर्क करण्यास केली सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 07:54 AM2022-03-10T07:54:39+5:302022-03-10T07:55:00+5:30
गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२: अमित शहा पूर्ण रणनीती राबवत आहेत. मगोपशी भाजप आणि काँग्रेस दोघेही संपर्क करीत आहेत.
शीलेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होत असून, आताच गोव्यात भाजप आणि काँग्रेसने सरकार स्थापन्यासाठी जोडतोडीचे गणित मांडायला सुरुवात केली आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि डी. के. शिवकुमार यांच्याशिवाय महाराष्ट्र सरकारमधील मंत्री सुनील केदार व कर्नाटक काँग्रेसचे नेते गुंडू राव यांनाही गोव्यात तैनात करण्यात आले आहे. सुनील केदार यांना पाठविण्यामागे नेतृत्वाला वाटते की, महाराष्ट्राचे नेते जोडतोडीत कुशल आहेत. छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे वळविण्याचे काम ते सहज पार पाडू शकतील.
पक्षाच्या सूत्रांनी खुलासा केला की, निवडून आलेल्या आमदारांना गरज पडल्यास मुंबईत आणता यावे म्हणून महाराष्ट्राच्या इतर मंत्र्यांनाही निकालानंतर गोव्यात पाठविले जाऊ शकते.
दुसरीकडे भाजपचेही जोडतोडीचे प्रयत्न वेगात सुरू आहेत. निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना ताबडतोब गोव्यात जाण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.
पाठिंब्याची आहे खूप खात्री...
खऱ्या अर्थाने अमित शहा पूर्ण रणनीती राबवत आहेत. मगोपशी भाजप आणि काँग्रेस दोघेही संपर्क करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे मगोप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात निवडणुकीच्या आधीच युती आहे. तृणमूल काँग्रेस आणि आप काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काँग्रेसला खात्री आहे की, तृणमूल काँग्रेस, आप आणि मगोपचा पाठिंबा आपल्याला मिळू शकतो.