Goa Assembly Election: शिवसेना आणि आपकडून आलेली ऑफर स्वीकारणार? उत्पल पर्रिकरांनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:05 AM2022-01-22T00:05:07+5:302022-01-22T00:05:31+5:30
Goa Assembly Election 2022: शिवसेना नेते संजय राऊत आणि आपचे अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या ऑफरबाबत विचारले असता उत्पल पर्रिकर यांनी आपण या ऑफरचा विचारही करू शकत नाही, असे सांगत या ऑफर स्पष्ट शब्दात फेटाळून लावल्या.
पणजी - गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपाने पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत आणि आपचे अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या ऑफरबाबत विचारले असता उत्पल पर्रिकर यांनी आपण या ऑफरचा विचारही करू शकत नाही, असे सांगत या ऑफर स्पष्ट शब्दात फेटाळून लावल्या.
उत्पल पर्रिकर म्हणाले की, मी माझ्या पक्षाने दिलेल्या ऑफर विचारात घेतल्या नाहीत. मग इतर पक्षांनी दिलेल्या ऑफरचा विचारही करू शकत नाही. मला लोकांना पर्याय द्यायचा आहे. मी माझ्यासाठी पर्याय मागत नाही, असे उत्पल पर्रिकर यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपा सोडणार का, अशी विचारणा केली असता उत्पल पर्रिकर यांनी भाजपा माझ्या रोज मनात असेल, असं सांगितलं. मी भाजपाला नाही भाजपाने मला सोडलंय, तुम्ही त्यांना विचारा असं ते म्हणाले, दरम्यान, उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांनाच उमेदवारी जाहीर केली. तसेच उत्पल पर्रिकर यांच्यासमोर पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला होता. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेरीस त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.