कर्नाटकातील हिंसाचाराचे गोवा विधानसभेत पडसाद
By Admin | Published: July 29, 2016 05:33 PM2016-07-29T17:33:51+5:302016-07-29T17:33:51+5:30
म्हादईच्या प्रश्नावर लवादाने दिलेल्या अंतरिम निवाड्यानंतर कर्नाटकात जो हिंसाचार उसळलेला आहे. तेथील गोमंतकीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २९ : म्हादईच्या प्रश्नावर लवादाने दिलेल्या अंतरिम निवाड्यानंतर कर्नाटकात जो हिंसाचार उसळलेला आहे. तेथील गोमंतकीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांना येथून संदेश गेलेला आहे. दंडुकेशाही, दादागिरी, तोडफोड या गोष्टींना लोकशाहीत थारा नाही याची जाणीव तेथील राज्यकर्ते ठेवणार आणि कलह निर्माण करणार नाही अशी अपेक्षा आहे, असे निवेदन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत केले.
आमदार रोहन खंवटे यांनी कर्नाटकातील गोवेकरांमध्ये तसेव कामा-धंद्यानिमित्त बेळगांव, धारवाडला जाणाऱ्या गोवेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गोव्यातील लोक तेथे असुरक्षित आहेत याकडे त्यानी लक्ष वेधले व याबाबतीत सरकारने कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.
मुख्यमंत्री यावर उत्तर देताना म्हणाले की, कर्नाटक गोव्याचा मोठा भाऊ आहे. एकमेकांकडे आम्ही दुष्मन म्हणून पाहू शकत नाही. हिंसाचाराचे प्रकार अज्ञानातून घडत आहेत. गोवा सरकारने कर्नाटककडे जाणाऱ्या आंतरराज्य बसगाड्या घाबरुन नव्हे तर तर खबरदारी म्हणून दोन तीन दिवस बंद ठेवलेल्या आहेत. गोमंतकीय कर्नाटकात आहेत तसेच कर्नाटकचे लोकही येथे आहेत. कर्नाटकचे लोक येथे सुरक्षित आहेत. गोवेकरांना कर्नाटकात कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांनी घाबरुनही जाऊ नये.