तामनार प्रकल्प रद्द करा; विरोधकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 10:26 AM2023-08-09T10:26:48+5:302023-08-09T10:28:59+5:30

प्रसंगी कोल्हापूरमधून वीज आणू : ढवळीकर

goa assembly monsoon session 2023 abolish the tamnar project opposition party demand | तामनार प्रकल्प रद्द करा; विरोधकांची मागणी 

तामनार प्रकल्प रद्द करा; विरोधकांची मागणी 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: तामनार १२०० केव्ही वीज वाहिन्या प्रकल्पासाठी कर्नाटकातच एलाइन्मेंट निश्चित झालेली नसताना सरकार गोव्यात हा प्रकल्प निश्चित कसा काय करू शकते, असा प्रश्न करून विरोधकांनी तामनार प्रकल्प रद्द करण्याचा रेट धरला, त्यामुळे सरकारला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पडले.

आमदार विजय सरदेसाई यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला पहिलाच प्रश्न उपस्थित केला तो तामनार प्रकल्पासंबंधी कर्नाटकातून वीजवाहिन्या नेमक्या कुठे टाकाव्यात याची निश्चिती झाली नसल्यामुळे गोवा सरकार यासाठी एलायन्मेंट कोणत्या आधारावर करते, असा प्रश्न त्यांनी केला. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे उद्या कर्नाटकात नियोजित भागातून वीजवाहिन्या नेण्यास मज्जाव करण्यात आला तर गोवा सरकारकडून करण्यात आलेली कोटयवधी रुपयांची गुंतवणूक फुकट जाणार नाही, काय असा प्रश्न त्यांना केला.

विरोधी पक्षनेते घरी आलेमाव, कार्लस आल्मेदा, एल्टॉन डिकॉस्टा आणि बेन्झी व्हिएगश यांनीही हाच मुद्दा ताणून धरताना प्रकल्पच रद्द करण्याची मागणी केली. मात्र प्रकल्पासाठी करण्यात आलेले काम वाया जाणार नाही, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. नियोजित भागातन वीज वाहिन्या गोव्यात आणण्यास कर्नाटक अपयशी ठरला तर कोल्हापूरमधून वीज घेण्याचीही सरकारची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, तामनार प्रकल्प हा गोव्याच्या भल्यासाठीच असल्याचे सांगताना वीजमंत्री म्हणाले की कर्नाटकातून वीज आणण्यासाठीचा हा विद्यमान प्रकल्प आंबेवाडी येथून सुरू होतो. तेथून सांगोडा, धारबांदोडा, कुंकळ्ळी, शेल्डे येवून या वीज वाहिन्या ओढल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी १०३ टॉवर पूर्ण झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

सरदेसाई-ढवळीकर यांच्यात जुगलबंदी

तामनार प्रकल्पावर चर्चा सुरु असतानाच वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मूळ मुद्यावरून जरा दुसरीकडे जाताना माणसाने आपली कर्मे चांगली केली पाहिजेत असे म्हटले आणि याच मुद्यावर सभागृहात कर्मवादावर चर्चा सुरु झाली. आपल्या प्रश्नावर अचूक उत्तर न देता मंत्री कर्मावर बोलतात हे पाहून विजय सरदेसाई यांनी मंत्री ढवळीकर यांची निवडणुकीपूर्वी कर्मे वेगळी होती आणि आता सरकारात सामील झाल्यानंतर वेगळी आहेत, असे सांगितले. निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसबरोबर युती केलेले ढवळीकर यांनी सामनार प्रकल्पाला विरोध केला होता, याची आठवण करून दिली. आता सरकारात सामील होऊन मंत्री भलतीच कर्मे करीत असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. सरकारच्या अशा कर्मामुळे गोव्याची वाट लागत असल्याचे सांगितले.

१४ हजार झाडे कापणार, खरे का ?

या प्रकल्पात १४ हजार झाडे कापली जाणार असल्याचे सरकारच्याच प्रतिज्ञापत्रात म्हटल्याचे सरदेसाई यांनी सांगितले, त्यावर झाडे अधिक कापावी लागणार नसल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. परंतु नेमकी किती झाडे कापावी लागणार, असा प्रश्न सरदेसाई यांनी विचारला असता यावर उत्तर देण्यासाठी मंत्र्यांनी वेळ मागितला.

 

Web Title: goa assembly monsoon session 2023 abolish the tamnar project opposition party demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.