पावसाळी अधिवेशन दीर्घकालीन; २० दिवस कामकाज, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 08:52 AM2023-06-14T08:52:36+5:302023-06-14T08:53:13+5:30
पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून सरकारची महत्त्वाची कायदा दुरुस्ती संमत केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल. अधिवेशन दीर्घकालीन असणार आहे. प्रत्यक्ष कामकाज १५ ते २० दिवसांचे असेल, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली.
तवडकर म्हणाले की, तारीख अजून ठरलेली नाही. पुढील एक-दोन दिवसांत ती निश्चित होईल. परंतु अधिवेशन दीर्घकालीन असणार आहे. विरोधी आमदारांची नेहमी तक्रार असते की, त्यांना प्रश्न मांडण्यास वेळ मिळत नाही. आगामी अधिवेशनात चर्चेसाठी पुरेसा वेळ त्यांना मिळेल.
सभापती तवडकर म्हणाले की, गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशन किमान २० दिवसांचे घेण्याचे ठरले होते. गेल्या वेळी रामनवमीच्या दिवशी अचानक कामकाज न घेण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवस कमी केला. खासगी कामकाजाचा दिवस न झाल्याने आमदारांना त्यांचे खासगी ठराव, खासगी विधेयके मांडता आली नाहीत.
दरम्यान, सभापती म्हणाले की, आगामी अधिवेशनात खासगी कामकाजाच्या दिवशी आमदारांना त्यांचे खासगी ठराव मांडता येतील. साधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अधिवेशन चालणार आहे.
- २० दिवसांचे अधिवेशन झाले तर गेल्या तीन वर्षांतील ते सर्वात मोठे अधिवेशन ठरेल. फेब्रुवारी २०१९ मध्ये कोविड महामारी आल्यापासून अल्प मुदतीचीच अधिवेशने झालेली आहेत.
- पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून सरकारची महत्त्वाची कायदा दुरुस्ती संमत केली जाणार आहे. या अधिवे- शनात ही महत्त्वाची विधेयके अखेरच्या दोन- तीन दिवसात घाईगडबडीत संमत केली जातात की, आमदारांना चर्चेसाठी वेळ दिला जातो, हे पाहावे लागेल.