फॉर्मेलिन मासेप्रश्नी गोंधळ सुरूच, सलग तिसऱ्या दिवशीही गोवा विधानसभा तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 01:06 PM2018-07-23T13:06:46+5:302018-07-23T13:09:57+5:30
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अजूनपर्यंत कामकाज झालेले नाही
पणजी : फॉर्मेलिनयुक्त मासळीच्या मुद्यावरून सलग तिसऱ्या दिवशी विरोधी काँग्रेस सदस्यांनी सभागृहात गदारोळ करत सभापतींना कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. 19 जुलै रोजी सुरू झालेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अजूनपर्यंत कामकाज झालेले नाही.
फॉर्मेलिनयुक्त मासळीचा धग अजूनही निवळलेला नाही. सभापती प्रमोद सावंत यांना सलग तिसऱ्या दिवशीही कामकाज तहकूब करावे लागले. गोव्यात सोमवारी ( 23 जुलै) 11.30 वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला तेव्हा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी उभे राहून फॉर्मेलिनयुक्त मासळीच्या मुद्यावरून पुन्हा स्थगन प्रस्तावाची मागणी केली. सभापती प्रमोद सावंद यांनी कामकाज नियमाचा दाखला देत स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी नाराजी व्यक्त करताना नियमाचा आधार घेऊन लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. विरोधकांनी सभापतीच्या आसनाजवळ जाऊन शेम शेमच्या घोषणा दिल्या. त्यानंतर सभापतींनी कामकाज 12.30 पर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले.
गदारोळात एक प्रश्न
प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतर भाजपाचे आमदार निलेश काब्राल यांचा एक प्रश्न चर्चेला आला. परंतु तोपर्यंत विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी करून गदारोळ सुरू केला होता. या गदारोळातच काब्राल यांनी प्रश्न विचारला व त्याचे उत्तरही नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी गदारोळातच दिले. परंतु उपप्रश्न विचारण्यापूर्वी सभापतींनी कामकाज तहकूब केल्याचे जाहीर केले.
अहंकार नको : कवळेकर
फॉर्मेलिन हा लोकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा असून अत्यंत गंभीर विषय आहे व त्यावर चर्चा व्हायला पाहिजे असे कवळेकर यांनी सांगितले. या मुद्यावर अहंकार बाजूला सारून स्थगन प्रस्तावाला मंजुरी द्या असे कवळेकर यांनी सांगितले.