गोवा : पैशांच्या वादावरून टॅक्सी चालकावर हल्ला, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By काशिराम म्हांबरे | Updated: June 24, 2024 16:38 IST2024-06-24T16:37:49+5:302024-06-24T16:38:21+5:30
जखमी टॅक्सी चालक प्रदीप सावंत याला उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोवा : पैशांच्या वादावरून टॅक्सी चालकावर हल्ला, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
म्हापसा: थिवी येथे लिफ्ट घेतलेल्या प्रवाशाकडून टॅक्सी चालकावर सुरी हल्ला करून त्याला जखमी करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात संशयित लेनी पीटर सिमॉईश याला कोलवाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर जखमी टॅक्सी चालक प्रदीप सावंत याला उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पैशांवरुन दोघांतही वाद झाल्याने ही घटना आज सोमवारी सकाळी घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. घटनेच्या दरम्यान टॅक्सी चालक म्हापसावरून अस्नोडाच्या दिशेने जात होता. वाटेवर वाद सुरु झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती टॅक्सी चालकाने दिली. टॅक्सीत मागच्या सिटावर बसलेल्या संशयिताने मागून आपल्यावर प्रहार केल्याचा दावाही टॅक्सी चालकाने केला. करण्यात आलेल्या हल्ल्यात चालकाच्या डोक्याला मार लागला आहे.
ज्यावेळी ही घटना घडली त्याच दरम्यान कोलवाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे घटना स्थळाकडून जात होते पण निर्माण झालेला वाद पाहून चौकशी करण्यासाठी वाहन थांबवले असता संशयिताने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण निरीक्षकांसोबत असलेले उपनिरीक्षक सुभाष गांवकर यांनी तातडीने हालचाली करून संशयिताला ताब्यात घेतले. पुढील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.