युरोपियन पर्यटकांसाठी किनाऱ्यांपलीकडील गोवा! 'वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट'मध्ये पर्यटन मंत्री सहभागी
By किशोर कुबल | Published: November 7, 2023 01:24 PM2023-11-07T13:24:48+5:302023-11-07T13:25:34+5:30
६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीतील 'वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट' साठी पर्यटनमंत्री रोहन खंवटे विदेशात
किशोर कुबल/पणजी: गोव्याचे पर्यटन खाते लंडनमधील वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी झाले असून युरोपियन पर्यटकांना किनाय्रांपलीकडेही गोव्यात पाहण्यासारखे बरेच काही आहे हे पटवून दिले जात आहे. सांस्कृतिक अनुभव, इको टुरिझम, हिंटरलँड टुरिझम, हेरिटेज टुरिझम, स्पोर्ट्स टुरिझम, फेस्टिव्हल टुरिझम, येथील खाद्य संस्कृती आणि सांस्कृतिक पर्यटन यासारख्या लोकप्रियता मिळवणाऱ्या पर्यटनस्थळांच्या पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. ६ तारीखपासून वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट सुरु झाले असून बुधवारी ८ तारीखपर्यंत चालणार आहे. त्यानिमित्ताने पर्यटनमंत्री रोहन खंवटे हेही विदेशात आहेत.
युरोपमधील अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध असलेल्या इ-टुरिस्ट व्हिसा सुविधेचा प्रचार राज्य सरकार करीत आहे.
शाश्वत पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी कटीबद्ध : रोहन खंवटे
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, ‘पर्यटन विभाग, गोवा सरकार पर्यटनाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि राज्यातील शाश्वत पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी कटीबद्ध आहे. गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणे आणि आपल्या पर्यावरणाचा आदर आणि संरक्षण करणाऱ्या जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहेआम्ही आंतरराष्ट्रीय प्रवासी संस्थांसोबत धोरणात्मक भागीदारी करण्यासाठी उत्सुक आहोत.’
वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये गोव्याच्या स्टॉलवर जीआय दर्जाची काजू फेणी, बेबिंका, यांसारख्या गोव्यातील स्वादिष्ट पदार्थांचे नमुने प्रदर्शित केले आहेत. काजू, आणि इतर मिठाईही ठेवली आहे. फलदायी बैठका आयोजित करण्यासाठी सह-प्रदर्शकांच्या सहभागाचीही व्यवस्था केली आहे.