गोव्यात भाजपा उमेदवाराकडून खून,वाहनचालकाचा गौप्यस्फोट
By admin | Published: February 20, 2017 10:51 PM2017-02-20T22:51:09+5:302017-02-20T22:51:38+5:30
सालेली (ता. सत्तरी, जि. उत्तर गोवा ) गावातील शाणू गावकर या युवकाच्या खुनाला तब्बल दहा वर्षांनी वाचा फुटली.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 20 - सालेली (ता. सत्तरी, जि. उत्तर गोवा ) गावातील शाणू गावकर या युवकाच्या खुनाला तब्बल दहा वर्षांनी वाचा फुटली. भाजपचे पर्ये विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांनीच गावकर यांना गोळ्या घालून ठार केल्याचा गौप्यस्फोट पांडुरंग अर्थलकर नामक विश्वजित यांच्याच पूर्वीच्या वाहनचालकाने केला आहे. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शाणू गावकर हा युवक २००६ मध्ये अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याला कोणीही पाहिलेच नाही. पोलिसांच्या अहवालातही बेपत्ता म्हणून त्याची नोंद झालेली आहे. दहा वर्षांपूर्वी बेपत्ता म्हणून घोषित झालेला शाणू बेपत्ता झाला नसून त्याचा गोळ्या झाडून खून केल्याची माहिती या वाहन चालकाने दिली आहे. राणे यांनी शाणूवर आपल्या डोळ्यादेखत दोन गोळ्या झाडल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि त्यांची ही कबुली ध्वनिचित्रफितीच्या (व्हीडीओ) रुपाने सोशल मीडियावर पसरलेली आहे. त्याची दखल पोलिसांनीही घेतली असून या प्रकरणात पांडुरंग अर्थलकर आणि इतरांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले आहे. गुन्हा अन्वेषण विभागातर्फे अर्थलकर व इतर साक्षीदारांना बरोबर घेऊन घटना घडलेल्या संबंधित बार कम हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दहा वर्षांपूर्वी सालेली-सत्तरी येथे स्टोन क्रॅशरवर सालेलीच्या नागरिकांनी विश्वजित राणेचे बंधू पृथ्वीराज राणे यांना ठेचून ठार मारले होते. या हत्याकांडात शाणूचा मुख्य हात होता, असे विश्वजितला वाटत होते. त्यामुळे आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी म्हणून त्याने हे कृत्य केल्याचेही वाहन चालकाने म्हटले आहे. गोळ्या झाडण्यापूर्वी ‘माझ्या भावाचा हत्यारा’ असे म्हणून गोळ्या झाडल्या आणि शाणू खाली पडला. तीन वाजता गोळ्या झाडल्या आणि सात वाजेपर्यंत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. विश्वजितबरोबर असलेले शाम गावकर, पुंडलिक देसाई आणि महम्मद रफीक नामक साथीदारांनी विल्हेवाट लावण्याचे काम केले, असे ध्वनिचित्रफितीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)