Pramod Sawant: १०० दिवसांत करून दाखवलं! गोव्यात हिंदूंचे धर्मांतर बंद? मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 04:07 PM2022-07-07T16:07:42+5:302022-07-07T16:09:14+5:30
Pramod Sawant: आम्ही हिंदूंचे धर्मांतर थांबवले जे पूर्वी होत होते, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.
पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी राज्यातील हिंदूंचे धर्मांतर थांबवल्याचा दावा केला आहे. गोवा सरकारने १०० दिवसांच्या आत धर्मांतरावर बंदी घातली आहे. एका कार्यक्रमात प्रमोद सावंत यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यात, भारतीय जनता पक्षाच्या 'डबल इंजिन की सरकार'च्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे.
या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रमोद सावंत म्हणाले की, आमच्या सरकारने धर्मांतरावर कठोर भूमिका घेतली आहे. आम्ही हिंदूंचे धर्मांतर थांबवले जे पूर्वी होत होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेले धर्मांतर थांबले आहे. बेकायदेशीर भूसंपादन प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एसआयटी स्थापन केली आहे, असे सावंत म्हणाले. याआधीही त्यांनी राज्यातील जनतेला धर्मांतराबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
अशा परिस्थितीत चुकूनही धर्मांतर होता कामा नये
यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले होते की, पुन्हा एकदा धर्मावर हल्ला होत आहे. मी खोटे बोलत नाही. गोव्यातील अनेक भागात लोक धर्मांतराकडे जात असल्याचे आपण पाहिले आहे. काही गरीब आहेत, काही संख्येने कमी आहेत, काही मागासलेले आहेत, काहींना अन्न किंवा नोकरी नाही अशा विविध गोष्टींचा फायदा घेत आहेत. अशा परिस्थितीत चुकूनही धर्मांतर होता कामा नये, असे आमचे म्हणणे आहे.
दरम्यान, गोवा सरकार कधीही धर्मांतराला परवानगी देत नाही, पण तरीही मला वाटते की, लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. गावातील मंदिर ट्रस्टने सतर्क राहण्याची गरज आहे, कुटुंबांनी सतर्क राहण्याची गरज आहे. ६० वर्षांपूर्वी आम्ही 'देव, धर्म आणि देश' म्हटले होते आणि याच भावनेने पुढे गेलो होतो. जर आपला देव सुरक्षित असेल तर आपला धर्म सुरक्षित असेल आणि आपला धर्म सुरक्षित असेल तर आपला देश सुरक्षित असेल, असेही ते म्हणाले होते.