पर्रीकरांच्या अनुपस्थितीत गोवा दिशाहीन, स्वकीयांच्या टीकेने भाजपा गोंधळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 01:53 PM2018-10-06T13:53:17+5:302018-10-06T14:00:36+5:30

आपल्या पक्षातील आमदारांना रोखावे कसे असा प्रश्न भाजपाला पडल्यासारखी स्थिती आहे.

Goa BJP Leader Calls Out Own Government For Unemployment | पर्रीकरांच्या अनुपस्थितीत गोवा दिशाहीन, स्वकीयांच्या टीकेने भाजपा गोंधळला

पर्रीकरांच्या अनुपस्थितीत गोवा दिशाहीन, स्वकीयांच्या टीकेने भाजपा गोंधळला

Next

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या गोव्यातील दीर्घ अनुपस्थितीमुळे गोव्याचे प्रशासन दिशाहीन बनले आहे अशी टीका आता विरोधकच नव्हे तर भाजपाचे आमदार मायकल लोबो आदी करू लागल्यामुळे सत्ताधारी भाजपा पक्ष संघटना सध्या गोंधळलेली आहे. आपल्या पक्षातील आमदारांना रोखावे कसे असा प्रश्न भाजपाला पडल्यासारखी स्थिती आहे.

पर्रीकर सरकारने आपल्या कारकिर्दीचे नुकते दीड वर्ष पूर्ण केले. मात्र दीड वर्षातील अर्धा कालावधी सरकारमधील मंत्री, आमदारांच्या आजारपणातच वाया गेला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व भाजपाचे दोन आमदार तर अजुनही रुग्णालयातच आहेत. गोव्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या अशी मागणी विरोधी काँग्रेस पक्ष व शिवसेनेने चालवली आहे. गोव्याचे प्रशासन ठप्प झाले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही चालवली आहे. भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनी विरोधकांच्या त्यात आरोपावर मोहर उमटविली. मुख्यमंत्री सगळ्या फाईल्स घेऊन बसले आहेत व त्यामुळे तीन हजार सरकारी पदे भरण्याचे काम अजून उरले आहे, अशी टीका लोबो यांनी केली. 

भाजपाचे ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनीही शनिवारी नोकर भरतीप्रश्नी व खनिज खाणप्रश्नी लोबो यांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत अशी भूमिका मांडली. लोबो यांनी प्रश्न उपस्थित करण्यामागील कारण भले वेगळे असेल पण प्रश्न दुर्लक्षिता येत नाहीत, असे ज्येष्ठ आमदार डिसोझा म्हणाले. भाजपचे दोन्ही खासदार लोकसभा निवडणुकीवेळी निवडून येणार नाहीत, कारण खाणप्रश्न सुटलेला नाही, अशी टीका चक्क भाजपाचेच आमदार असलेले विधानसभा उपसभापती लोबो यांनी केल्यामुळे भाजपा पक्ष संघटनेत गोंधळच उडाला आहे. लोबो यांना कसे रोखावे ते भाजपाला कळेनासे झाले आहे. मुख्यमंत्री जर गोव्यात असते तर त्यांनी लोबो यांना रोखले असते असे भाजपाच्या एका गटला वाटते.

लोबो यांनी पक्ष शिस्त पाळावी, त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर काय ते बोलावे, असा सल्ला आता भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी दिला आहे. वास्तविक गोव्याचा खाणप्रश्न सुटावा म्हणून मुख्यमंत्री पर्रीकर हे रुग्णालयातून केंद्र सरकारला पत्र लिहित आहेत याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला हवे, असे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी टीकाकारांना उत्तर देताना म्हटले आहे.
 

Web Title: Goa BJP Leader Calls Out Own Government For Unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.