डिसोझा-लोबो यांची भूमिका भाजपाला मारक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 12:15 PM2018-10-06T12:15:01+5:302018-10-06T12:15:40+5:30

डिसोझा हे पुढील आठवड्यात 10 ऑक्टोबर नंतर आपले उपचार पूर्ण करुन गोव्यात परतत आहेत. तर लोबो यांनी 10 ऑक्टोबर नंतर आपली पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Goa BJP Michael Lobo and Francis D'Souza | डिसोझा-लोबो यांची भूमिका भाजपाला मारक 

डिसोझा-लोबो यांची भूमिका भाजपाला मारक 

googlenewsNext

म्हापसा - माजी मंत्री तथा म्हापशाचे आमदार भाजपाचे जेष्ठ नेते अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा तसेच कळंगुटचे आमदार उपसभापती मायकल लोबो या दोघांची एकमेका प्रती बदललेली भूमिका तसेच पक्षाने मंत्रिमंडळात फेरबदल करताना घेतलेले निर्णय दोघांच्या विरोधात गेले आहेत. या निर्णया विरोधात दोघांनी पक्षा विरोधात घेतलेली भूमिका व एकमेका प्रती व्यक्त केलेली सहानुभूती बार्देस तालुक्यात भाजपाच्या पुढील वाटचालीला एकंदरीत मारक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याच मुद्यावरुन दोन्ही नेते एकत्रित येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. 

डिसोझा हे पुढील आठवड्यात 10 ऑक्टोबर नंतर आपले उपचार पूर्ण करुन गोव्यात परतत आहेत. तर लोबो यांनी 10 ऑक्टोबर नंतर आपली पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनी ठरवलेली वेळ एकच असल्याने सध्या चर्चेचा विषय बनली आहे. त्यातून दोघेही एकत्रित येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नसल्याने दोघांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यातील तिसरे भाजपा आमदार ग्लेन टिकलो हे डिसोझा यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी सुद्धा फेरबदलानंतर सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही नेते एकत्रित आल्यास ते सुद्धा त्यांना समर्थन देवू शकतात. 

राज्यातील मंत्रीपदी असताना अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या डिसोझा यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आला तर लोबो हे सुद्धा लंडन दौऱ्यावर असताना मंत्रीमंडळात फेरबदल करण्यात आला. डिसोझा यांनी आपल्याला विश्वासात न घेता डच्चू दिल्याने पक्षावर राग काढण्यास सुरुवात केली तर डिसोझा यांच्या जागी अपेक्षित असलेली संधी आपल्याला देण्यात न आल्याने लोबो यांनी पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. अल्पसंख्यांक समाजातील या नेत्यांनी उघडपणे पक्षाविरोधात भूमिका घेतली होती.

 राज्य विधानसभेच्या निवडणुकीनंतर डिसोझा यांच्यामुळे मंत्रीपद मिळवण्याची आपली संधी वाया गेल्याची भावना लोबो यांची झाल्यानंतर त्यांनी मागील दीड वर्षापासून सततपणे डिसोझा यांना विकासाच्या मुद्यावरुन लक्ष करण्याची भूमिका स्वीकारली होती. तालुक्याची राजधानी असलेल्या म्हापसा शहरातील विकासावर डिसोझा यांच्यामुळे परिणाम झाल्याचा मुद्दा सततपणे मांडत होते. लोबो यांची टिका मोडीत काढताना डिसोझा कळंगुट मतदारसंघात घडत असलेल्या गैरप्रकारावर बोट ठेवले होते. एकाच समाजातील या दोन्ही नेत्यांचे म्हणावे तसे संबंध सुद्धा त्यामुळे दिसून येत नव्हते. दोघांच्या या वादात पक्षाने वेळोवेळी हस्तक्षेप करुन दोघांची समजूत सुद्धा काढून टिका न करण्याची सुचना सुद्धा केली होती. 

मागील काही दिवसापूर्वी तालुक्यावर परिणामकारक ठरणाऱ्या मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर दोन्ही नेते एकमेकांना सहानुभूतीपूर्वक पाहू लागले आहेत. शुक्रवारी लोबो यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर उघडपणे टिका करताना डिसोझा यांच्या प्रती भूमिकेत केलेला बदल स्पष्टपणे दाखवून दिला. ते आपले नेते व मार्गदर्शक असल्याचे लोबो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दुसऱ्या बाजूने अमेरिकेत उपचार घेत असलेल्या डिसोझा यांनी लोकमतशी संपर्क साधून लोबो यांनी केलेल्या टिकेचे समर्थन केले. मुख्यमंत्र्यांवर लोबो यांनी केलेल्या टिकेत तथ्य असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. एकंदरीत डिसोझा यांच्या परतण्यावर व लोबो यांनी जाहीर केलेल्या तारखेवर बरेच साम्य असल्याने दोन्ही नेते एकत्रित आल्यास पक्षासाठी ते मारक ठरण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Goa BJP Michael Lobo and Francis D'Souza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.