गोव्यातही भाजपला बसतेय बंडखोरीची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:21 AM2019-04-13T06:21:14+5:302019-04-13T06:21:14+5:30

गटबाजी करत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाविरुद्ध असंतोष

In Goa, the BJP is in rebellion | गोव्यातही भाजपला बसतेय बंडखोरीची झळ

गोव्यातही भाजपला बसतेय बंडखोरीची झळ

Next

पणजी : काँग्रेसमधून आमदारांना फोडून भाजपमध्ये आणले जात असल्याने व भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून दिवंगत आमदारांच्या मुलांना थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे तिकीट दिले जात असल्याने गोव्यातील भाजपमध्येही नेते, प्रमुख कार्यकर्ते यांच्यात बंडखोरीची भावना निर्माण झाली आहे. काहीजणांनी उघड बंड केले तर काहीजणांनी छुप्या पद्धतीने गटबाजी करत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाविरुद्ध असंतोष व्यक्त केला आहे.


दयानंद सोपटे या काँग्रेस आमदाराला भाजपने आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडले व त्यामुळे भाजपचे अत्यंत ज्येष्ठ नेते
व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बंडाची भूमिका घेतली. त्यांनी गोवा प्रदेश भाजपच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत जोरदार असे प्रहार जाहीरपणे केले. तीन महिने त्यांनी जाहीरपणे भाजपला प्रश्न विचारत आपण प्रसंगी अपक्ष निवडणूक लढवीन असे जाहीर केले. शेवटी भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी पार्सेकर यांच्यासोबत अनेक बैठका घेऊन त्यांचे मन वळविले.


सोपटे यांच्यासोबतच सुभाष शिरोडकर या काँग्रेस आमदारालाही भाजपने राजीनामा देण्यास भाग पाडून आपल्या पक्षात घेतले व यामुळे भाजपचे नेते तथा माजी उद्योग मंत्री महादेव नाईक यांनी बंड करत भाजपला सोडचिठ्ठी दिली. ते आता शिरोडा मतदारसंघात होत असलेली विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवत आहेत.


म्हापसा मतदारसंघाचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाले. म्हापसा या रिक्त मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक आली. सध्या प्रचार काम सुरू आहे. त्या पोटनिवडणुकीत भाजपने डिसोझा यांचे पुत्र जोशुआ यांना तिकीट दिले. यामुळे माजी नगराध्यक्ष व वीस वर्षे भाजपमध्ये घालविलेले सुधीर कांदोळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. ते भाजपमधून बाहेर आले व त्यांनी नुकतेच काँग्रेस पक्षाचे तिकीट स्वीकारले.

उत्पल यांच्या उमेदवारीने कुंकळयेकर नाराज
पणजी मतदारसंघही माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झाला. तिथे पुन्हा पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना तिकीट देण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर व त्यांचे सहकारी अस्वस्थ आहेत.
च्अलीकडेच भाजपने मगो पक्षात फूट पाडली व मगोपचे दोन आमदार बाबू आजगावकर व दीपक प्रभू पाऊसकर यांना भाजपमध्ये आणले. यामुळे गेली ४० वर्षे भाजपचे काम करत असलेले माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: In Goa, the BJP is in rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.