गोवा भाजपाची वेबसाईट ‘हॅक’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 06:46 PM2018-10-15T18:46:51+5:302018-10-15T18:47:09+5:30
गोवा भाजपाची अधिकृत वेबसाईट सोमवारी हॅक झाल्याचे आढळून आले.
पणजी: गोवाभाजपाची अधिकृत वेबसाईट सोमवारी हॅक झाल्याचे आढळून आले. या वेबसाईटवर वेबसाईट हॅक करण्यात आल्याची सूचना होती व पाकिस्तान जिंदाबादची घोषणाही होती. परंतु नंतर उशिरा या वेबसाईटवर पुन्हा ताबा मिळविण्यास भाजपच्या आयटी विभागाकडून निकराचे प्रयत्न सुरू होते.
गोवा भाजपच्या वेबसाईटवर ‘हॅक्कड’ असा संदेशासह पाकिस्तान जिंदाबादची घोषणाही होती. त्यामुळे वेबसाइट हॅक करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर ही वेबसाइट पुन्हा ताब्यात घेण्याचे प्रयत्न पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरू होते. त्यात यश आल्याचेही पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. संध्याकाळी या वेबसाईटवर हॅक्कड संदेश व पाकिस्तान जिंदाबादची घोषणाही हटविण्यात आली होती. त्या जागी ‘भारतीय जनता पार्टी’ जय हिंद, जय भारतची घोषणा होती. परंतु वेबसाईट अंडर कन्स्ट्रक्शनचा बॅनर दिसत असल्यामुळे लोकांना ती वापरता येत नव्हती.
या विषयी पक्षाचे सरचिटणीस सदानंद तनावडे यांना विचारले असता ती पक्षाची फार जुनी वेबसाईट असल्याचे त्यांनी सांगितले. ती वापरलीही जात नव्हती, त्यामुळे फारसे काही बिघडले नाही असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलीसातही अद्याप तक्रार देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.