गोवा भाजपाला ऑक्टोबरमध्ये मिळणार नवे प्रदेशाध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 11:26 AM2019-06-09T11:26:51+5:302019-06-09T11:42:31+5:30
गोवा प्रदेश भाजपाला नवे अध्यक्ष येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मिळणार आहेत. भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया येत्या महिन्यात सुरू होईल.
पणजी - गोवा प्रदेश भाजपाला नवे अध्यक्ष येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मिळणार आहेत. भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया येत्या महिन्यात सुरू होईल. ही प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल व गोवा भाजपाला नवे प्रदेशाध्यक्ष मिळतील, असे पक्ष सुत्रांनी सांगितले.
राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपलेला आहे. भाजपाची सदस्य नोंदणी मोहीमही लवकरच सुरू होईल. मग पक्ष संघटनेत विविध स्तरांवरील निवडणुका होतील. उत्तर व दक्षिण गोव्यासाठी जिल्हा अध्यक्षही निवडले जातील. भाजपाच्या विविध मोर्चाचे अध्यक्ष निवडले जातील आणि शेवटी प्रदेशाध्यक्ष निवड होईल.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा विचार केला जाईल असे प्रारंभी अनेकांना वाटत होते पण आता स्थिती बदलली आहे. पार्सेकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले जाणार नाही अशी माहिती मिळाली. राजकीयदृष्टय़ा भाजपा कोणतीही नियुक्ती करताना जातीय समीकरणांचा खूप विचार करतो. मुख्यमंत्री मराठा समाजातील आहेत व प्रदेशाध्यक्षही मराठा समाजातील असे भाजपा होऊ देणार नाही, असे एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. सदानंद शेट तानावडे हेही मराठा समाजातील आहेत व त्यामुळे त्यांचाही विचार प्रदेशाध्यक्ष पदासाठी होण्याची शक्यता काही जणांना खूप कमी वाटते. यापूर्वीच्या काळात राजेंद्र आर्लेकर, श्रीपाद नाईक आदींनी भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे. यावेळी नव्या रक्ताला वाव दिला जाईल. दामू नाईक यांचेही नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुढे येऊ शकते किंवा पुन्हा आर्लेकर यांच्या नावाचा देखील विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षात त्याविषयी अजून गंभीरपणे विचार झालेला नाही असे एका नेत्याने स्पष्ट केले आहे.