गोव्यात भाजपाला पोटनिवडणुकीतही अनुकुलता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 02:23 PM2019-05-23T14:23:27+5:302019-05-23T15:47:57+5:30

प्रस्थापित विरोधी लाट असतानाही मोदींची किमया थोड्याफार प्रमाणात गोव्यात चालली आणि पोटनिवडणुकीत भाजपाला समाधानकारक यश मिळाले.

In Goa, the BJP's by-election inequality | गोव्यात भाजपाला पोटनिवडणुकीतही अनुकुलता

गोव्यात भाजपाला पोटनिवडणुकीतही अनुकुलता

googlenewsNext

- राजू नायक

पणजी : सत्ताधारी भाजपने जरी कमी संख्येने का होईना परंतु निवडणुकीची बाजी ३ -१ व १-१ अशी जिंकली असली तरी त्यांच्या संघटनात्मक कामाची ही सरशी आहे. या निकालाने काही प्रमाणात का होईना परंतु सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील प्रस्थापित विरोधी लाट त्यांना अडवून ठेवता आली. मनोहर पर्रीकर यांच्या पश्चात घडलेली भाजपसाठीची ही पहिली निवडणूक. या शिवाय पक्षामधील अस्वस्थता, मुख्यमंत्री पदावर नवखा नेता व रा. स्व. संघातील बंडखोरी यांचा सामना पक्षाला करावा लागला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जो अनेक वर्षे भाजपची साथ करत होता, त्यानेही वैयक्तिक कारणांवरून काँग्रेसची साथ केली होती.

या पार्श्वभूमीवर शिरोडा, म्हापसा व मांद्रे या जागा कमी फरकाने का असेना भाजपने जिंकल्या आहेत. या पैकी शिरोडा व मांद्रे विधानसभा पोटनिवडणूक भाजपने दोन उमेदवार काँग्रेसमधून पळविल्यामुळे घ्यावी लागली, तर पणजी व म्हपासाची पोटनिवडणूक तेथील भाजपचे आमदार दिवंगत झाल्यामुळे घ्यावी लागली. पणजीत पर्रीकरांचे पूत्र उत्पल पर्रीकर यांना सुरवातीला आश्वासन देऊन नंतर उमेदवारी नाकारण्यात आली. तेथे घराणेशाहीला नाकारताना माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या विरोधात मतदारांमध्ये नाराजी असतानाही तिकीट देण्यात आले. पणजीमध्ये एक मोठा वर्ग जो ख्रिस्ती आहे, भाजपला अस्पृश्य मानत असतानाही पर्रीकरांना मतदान करत होता, त्याने यावेळी बाबूश मोन्सेरात यांची साथ करणे पसंद केले.

म्हापसा शहरात भाजपचे दिवंगत नेते फ्रान्सीस डिसोझा याचे पूत्र जोशुआ यांना उमेदवारी देण्याची जोखीम यशस्वी झाली.
स्वाभाविकपणे भाजपला देशातील मोदी लाटेचा काही प्रमाणात फायदा झालेला आहे. दक्षिणेत मात्र अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजाने भाजपची साथ करण्याचे नाकारले आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात जेथे हिंदू प्राबल्य आहे, तेथे मोदी लाट जाणवली. तेथे श्रीपाद नाईक चौथ्यांदा विजयी झाले.

 

 

Web Title: In Goa, the BJP's by-election inequality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.