यंदाही मुलींचीच बाजी! गोव्यात बारावीचा निकाल ८९.५९ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 01:44 PM2019-04-30T13:44:21+5:302019-04-30T13:52:40+5:30
गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल यंदा ८९.५९ टक्के एवढा लागला आहे. वाणिज्य शाखेचा सर्वाधिक ९१.८६ टक्के, कला शाखेचा ८७.७३ टक्के, विज्ञान शाखेचा ९१.७६ टक्के तर व्यावसायिक शाखेचा ८४.४५ टक्के एवढा लागला.
पणजी - गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल यंदा ८९.५९ टक्के एवढा लागला आहे. वाणिज्य शाखेचा सर्वाधिक ९१.८६ टक्के, कला शाखेचा ८७.७३ टक्के, विज्ञान शाखेचा ९१.७६ टक्के तर व्यावसायिक शाखेचा ८४.४५ टक्के एवढा लागला. यंदाही ९१.९७ एवढी उत्तीर्ण टक्केवारी राखून मुलींनीचेच वर्चस्व राहिले तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ही ९६.९१ टक्के एवढी राहिली आहे.
तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा बारावीच्या निकालाने उच्चांक गाठला आहे. २०१६ मध्ये ९०.१० टक्के एवढा निकाल लागला होता. त्यानंतर यंदाचा ८९.५९ टक्के हा निकाल उच्चांक आहे. राज्यातील खासगी व सरकारी मिळून एकूण २६ उच्च माद्यमिक विद्यालयांचा निकाल हा ९५ टक्के व अधिक लागला आहे. सरकारी उच्च माद्यमिक विद्यालयांनीही यंदा चांगली कामगिरी बजावली आहे. एकूण १९९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १५१८७ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हापसा परीक्षा केंद्रावर सवार्धिक म्हणजे ९५.३५ टक्के उत्तीर्ण तर साखळी परीक्षा केंद्रात सर्वात कमी ७८.३४ टक्के एवढी उत्तीर्ण टक्केवारी आहे.
३०९३ विद्यार्थ्यांना क्रीडा धोरणाचा लाभ मिळाला आहे. क्रीडा धोरणाच्या लाभामुळे ११४ विद्यार्थी (०.७५ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. तसेच १५ टक्के विद्यार्थ्यांनी ७५ -१०० टक्के गुण मिळविले आहेत. ४० टक्के विद्यार्थ्यांनी ६०-७४ टक्के गुण, ३५ टक्के विद्यार्थ्यांनी ४५ ते ५९ टक्के तर ७ टक्के विद्यार्थ्यांना ३३ ते ४४ टक्के गुण मिळाले आहेत.