Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची विजयी सलामी
By समीर नाईक | Published: November 4, 2023 07:07 PM2023-11-04T19:07:16+5:302023-11-04T19:07:56+5:30
Goa News: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारपासून सुरू झालेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष व महिला संघानी सलामीच्या सामन्यात शानदार सुरुवात करत यजमान गोवा संघावर मोठा विजय मिळवला.
- समीर नाईक
पणजी - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारपासून सुरू झालेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष व महिला संघानी सलामीच्या सामन्यात शानदार सुरुवात करत यजमान गोवा संघावर मोठा विजय मिळवला. स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारतीय खोखो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी आणि स्पर्धा संचालक डॉ. चंद्रजीत जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
फोंडा येथील मल्टीपर्पज मैदानावर सुरू झालेल्या सलामीच्या खो-खो सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने यजमान गोवा संघावर ९०-१२ असा १ डाव ७८ गुणांनी दणदणीत धुव्वा उडवला. महाराष्ट्राकडून पायल पवार आणि प्रतीक्षा बिराजदार यांनी प्रत्येकी ३.३० मि. पळतीचा खेळ केला. संपदा मोरेने २.४० मि. संरक्षण करताना ४ गुण मिळवले तर प्रीती काळेने १.३० मि. संरक्षण करताना ४ गुण मिळवले. प्रियंका भोपीने २:२० मि. संरक्षण करताना २ गुण मिळवले, किरण शिंदेने आपली आक्रमणाची धार कायम राखत १२ गुण मिळवले तर पूजा फार्गाडे व प्रियांका इंगळेने प्रत्येकी १०-१० गुण संघासाठी वसूल केले. गोव्याकडून सावित्री गौडोने चांगली कामगिरी केली.
महिला संघांपाठोपाठ पुरुष गटात महाराष्ट्राने गोवा संघावर ५६-१६ असा १ डाव ४० गुणांनी दणदणीत विजय साकारला. महाराष्ट्राकडून खेळताना कर्णधार रामजी कश्यपणे २.२० मि. संरक्षण करून २ गुण मिळवले. ऋषिकेश मुर्चावडेने २ मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले. सुयश गरगटेने १.४० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले तर आदित्य गणपुलेने २ मि. पळतीचा खेळ करत २ गुण मिळवले. ओमकार सोनवणे १.४० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवण्यात यश मिळवले. लक्ष्मण गवसने २ मि. संरक्षण केले. गोव्याकडून अनिकेत वेळीपने आक्रमणात ४ गुण वसूल केले, तसेच प्रथमेश सपकाळने चांगली कामगीरी केली.
उद्घाटनीय पुरुषांच्या सामन्यात कर्नाटकने तेलंगणाचा ६०-२४ असा ३६ गुणांनी पराभव करीत चांगली विजयी सलामी दिली.
महिलांच्या सामन्यात दिल्लीने हरियाणावर ५०-२८ असा ४.२५ मि. राखून २२ गुणांनी विजय मिळवला.