गोव्याचा अर्थसंकल्प सादर; रोजगार निर्मिती, कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रवर अर्थसंकल्पाचा भर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 05:53 PM2019-07-18T17:53:36+5:302019-07-18T17:54:06+5:30
रोजगार निर्मिती आणि कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रतील गुंतवणुकीवर भर देणारा गोव्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला.
पणजी - रोजगार निर्मिती आणि कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रतील गुंतवणुकीवर भर देणारा गोव्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. 450 कोटी रुपयांचा हा शिलकी (अतिरिक्त महसूल )अर्थसंकल्प आहे.
मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या आजारपणाच्या काळात मुख्यमंत्रिपदी असताना अर्थसंकल्पीय भाषण तयार केले होते. मुख्यमंत्री सावंत यांनी तेच भाषण सादर केले. मात्र काळानुरुप त्यात काही बदल केले गेले आहेत. अर्थसंकल्पातील आकडेवारी मात्र जुनीच आहे. मिरामार येथे स्वर्गीय पर्रीकर यांचे स्मारक बांधण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 19 हजार 500 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतुद असलेला हा अर्थसंकल्प आहे. दहा टक्के विकास दर अपेक्षित धरण्यात आला आहे.
येत्या तीन वर्षात सरकारी व खासगी क्षेत्रात अनेक रोजगार संधी निर्माण केल्या जातील. एक खिडकी योजना अस्तित्वात आणल्यानंतर राज्यात गुंतवणूक वाढेल. प्राथमिक स्तरापासून विद्यापीठ स्तरापर्यंतच्या शिक्षणाच्या दर्जात सुधारणा केली जाईल. तांत्रिक शिक्षणाचा अभ्यासक्रम दुरुस्त केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
सागर माला योजनेंतर्गत राज्यातील नऊ जेटींचे आधुनिकीकरण केले जाईल. राज्याचे पर्यटन केवळ किनारपट्टीपुरतेच मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातही ते नेले जाईल. पर्यटकांना स्वयंपाक करण्यास, कपडे बदलण्यास, शौचास जाण्यासारखे विधी पार पाडण्यास आवश्यक सुविधा पुरविल्या जातील. खासगी क्षेत्रच्या सहभागाने अशा सुविधा आऊटसोर्स केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. वाहतूक भवन बांधणे, पाटो- पणजी व डिचोलीत सर्व सरकारी कार्यालयांसाठी प्रशासकीय प्रकल्प, जैकाची कामे 2020 पर्यंत पूर्ण करणे, मलनिस्सारण व्यवस्थेचे जाळे राज्यभर पसरविणे आणि गोव्याला 31 ऑगस्टपर्यंत हागणदारीमुक्त करणे अशी विविध उद्दीष्टे सरकारने समोर ठेवल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.