गोव्याचा अर्थसंकल्प गुरुवारी मंत्री ढवळीकर मांडणार, अधिवेशनाला फक्त तीन दिवस शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 04:24 PM2018-02-19T16:24:39+5:302018-02-19T16:24:50+5:30
गोव्याचा 2018-19 सालासाठीचा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते सभागृहात मांडला जाणार आहे.
पणजी : गोव्याचा 2018-19 सालासाठीचा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते सभागृहात मांडला जाणार आहे. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज चार दिवसांपुरते मर्यादित ठेवण्यात आले असून, आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत.
मंत्री ढवळीकर हे अर्थसंकल्प वाचून दाखवणार नाहीत. ते फक्त अर्थसंकल्पाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवतील. राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर केवळ ठेवण्याची वेळ प्रथमच येत आहे.
पाच महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून घेतले जाणार आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी प्रारंभ झाला. सोमवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. ते चार दिवसांच्या अधिवेशनाला येणार नाहीत. कारण मुंबईतील लीलावती इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे नेते म्हणून मगो पक्षाचे नेते असलेले मंत्री ढवळीकर हे सत्ताधा-यांच्या वतीने काम पाहतील. भाजपानेही तसेच जाहीर केले व मंत्री ढवळीकर यांनीही तसेच पत्रकारांना सांगितले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी अभिभाषण सादर केले. त्यानंतर सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्या मंगळवारपर्यंत विधानसभा कामकाज तहकूब केले जात असल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी सभापतींनी मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी माहिती दिली. कुणीच अफवांवर विश्वास ठेवू नये. मुख्यमंत्री उपचारांना प्रतिसाद देत असून ते लवकर बरे होऊन यावेत, अशी प्रार्थना आम्ही करू या असे निवेदन केले.
दुपारी सभापतींनी विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची (बीएसी) बैठक घेतली. मंत्री सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आदींनी या बैठकीत भाग घेतला. विधानसभेचे कामकाज पूर्वी 22 मार्चपर्यंत चालवावे असे ठरले होते. तथापि मुख्यमंत्री आजारी असल्याने केवळ चारच दिवस कामकाज ठेवू या असे बैठकीत ठरले. गुरुवारी 22 रोजी मंत्री ढवळीकर यांनी अर्थसंकल्प मांडावा असेही ठरले. वर्षाला जेवढे दिवस विधानसभेचे कामकाज व्हावे असे नियमानुसार अपेक्षित आहे, तेवढे दिवस ते व्हायला हवे, अशी भूमिका कवळेकर यांनी मांडली आहे.
सोमवारी दिवसभर अनेक बैठका झाल्या. सकाळी भाजपाच्या आमदारांची बैठक झाली व त्या बैठकीवेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आरोग्याविषयीची माहिती आमदारांना देण्यात आली. ते अधिवेशनाला येऊ शकणार नाहीत याचीही कल्पना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपप्रणीत सत्ताधारी आघाडीचीही बैठक सोमवारी पार पडली. ढवळीकर हे सभागृहात नेते म्हणून काम पार पाडतील हे त्यावेळी मान्य केले गेले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांना सांगितले, की ढवळीकर हे पर्रीकर मंत्रिमंडळातील दुस-या क्रमांकाचे मंत्री आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवस अधिवेशनात तेच सभागृहाचे नेते असतील. भाजपाचे विधिमंडळ गटनेते म्हणून मात्र मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे काम पाहणार आहेत.
फाईल्स ढवळीकरांकडे
दरम्यान, आपण प्रभारी मुख्यमंत्री नव्हे पण मुख्यमंत्र्यांकडे एरव्ही ज्या फाईल्स जायला हव्यात, त्या सगळ्या फाईल्स पर्रीकर यांच्या अनुपस्थितीमुळे आता आपल्याकडे येतील, असे मंत्री ढवळीकर यांनी सोमवारी अधिवेशनातील पहिल्या दिवसाच्या कामकाजानंतर पत्रकारांना सांगितले.