Goa: गोव्याच्या आमदारांच्या भत्ते आणि पेन्शनमध्ये घसघशीत वाढ, मंत्रिमंडळाची मंजुरी
By किशोर कुबल | Published: August 9, 2023 11:39 PM2023-08-09T23:39:03+5:302023-08-09T23:39:22+5:30
Goa: मंत्रिमंडळाने बुधवारी बैठकीत आमदारांचे भत्ते आणि पेन्शनमध्ये भरीव वाढ करण्यास मंजुरी दिली. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती आणली जाईल. रात्री उशिरा सुत्रांनी ही माहिती दिली.
- किशोर कुबल
पणजी - मंत्रिमंडळाने बुधवारी बैठकीत आमदारांचे भत्ते आणि पेन्शनमध्ये भरीव वाढ करण्यास मंजुरी दिली. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती आणली जाईल. रात्री उशिरा सुत्रांनी ही माहिती दिली. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून मुख्यमंत्र्यांनी त्यातून वेळ काढत सायंकाळी उशिरा मंत्रिमंडळाची बैठक घेतली व तींत काही महत्त्वाचे निर्णय झाले.
आमदाराला आता आमदारकीच्या कार्यकाळाच्या जेष्ठतेनुसार ७५ हजार रुपयां ऐवजी कमाल २ लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकेल. चालू विधानसभा अधिवेशनातच ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांनी वेतनवाढीचे मागणी केली होती. प्रस्तावित वेतनवाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल १९ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
अधिवेशन काळात दिवशी भत्ता ३००० रुपयांवरून ४००० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. कार खरेदीसाठी कर्ज मर्यादा १५ लाखांवरून ४० लाख रुपये, पेन्शन दरमहा ३०,००० रुपये व त्यात वार्षिक वाढ ४००० रुपये, पेट्रोल किंवा डिझेल दरमहा ३०० लिटरवरून ५०० लिटर,घर खरेदीसाठी कर्ज मर्यादा ३० लाखांवरून ४५ लाख रुपये करण्यात येणार आहे.याशिवाय आमदार स्वतःसाठी पाच कर्मचाऱ्यांऐवजी आता सात कर्मचारी दिमतीला घेऊ शकतील.
सभापतींसाठी वैद्यकीय भत्ता ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात येईल.
आमदारांसाठी महिना ३०० लिटर इंधनाऐवजी ६०० लिटर दिले जावे तसेच कार खरेदीसाठी सध्याची कर्ज मर्यादा १५ लाख रुपये आहे ती अपुरी पडत असल्याने किमान ३० लाख रुपये करावे, अशी मागणी कामत यांनी केली होती. ते म्हणाले होते की, इनोवा मोटार खरेदी केली तरी त्याची किंमत ३० लाख रुपये होते. त्यामुळे सरकारने या गोष्टीवर गंभीरपणे विचार करायला हवा. या अनुषंगाने काल मंत्रिमंडळ बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.