गोव्यात अतिरिक्त खाती वाटपाची शक्यता संपुष्टात, मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 11:28 AM2018-12-19T11:28:04+5:302018-12-19T11:28:24+5:30

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल, अशी चर्चा गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू झाली तरी त्यानंतर व अगदी अलिकडेपर्यंत झालेल्या हालचालींनंतर आता अतिरिक्त खाते वाटपाची शक्यता संपुष्टात आली आहे.

Goa cabinet meeting will be held on 20 December | गोव्यात अतिरिक्त खाती वाटपाची शक्यता संपुष्टात, मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक

गोव्यात अतिरिक्त खाती वाटपाची शक्यता संपुष्टात, मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक

Next

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल, अशी चर्चा गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू झाली तरी त्यानंतर व अगदी अलिकडेपर्यंत झालेल्या हालचालींनंतर आता अतिरिक्त खाते वाटपाची शक्यता संपुष्टात आली आहे. पर्रीकरांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचे घटक असलेल्या गोवा फॉरवर्ड व मगो पक्षाच्याही काही नेत्यांना याची कल्पना आली आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर आजारी असले तरी, पर्रीकर यांच्याकडे 26 पेक्षा जास्त खाती आहेत. त्यात शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, उद्योग, सहकार, पर्यावरण, वन, अर्थ, गृह, पर्सनल, सर्वसाधारण प्रशासन अशा अनेक प्रमुख खात्यांचा समावेश होतो. मुख्यमंत्री त्यांच्याकडील महत्त्वाची खाती अन्य मंत्र्यांना देऊ पाहत होते. अतिरिक्त खात्यांचे वाटप केल्यानंतर प्रशासन सक्रिय होईल, असे मंत्र्यांनाही वाटत होते. बहुतांश मंत्र्यांनी वारंवार अतिरिक्त खाती मिळावीत अशी विधाने केली. मंत्री विजय सरदेसाई, रोहन खंवटे, सुदिन ढवळीकर यांच्यासह विश्वजित राणे हेही अतिरिक्त खाती मिळावीत म्हणून प्रयत्नशील राहिले.

मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वी सर्व मंत्र्यांशी अतिरिक्त खात्यांबाबत चर्चा करून त्यांना कोणती खाती हवी हेही जाणून घेतले होते. मात्र भाजपच्या दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाने पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला व तुम्ही अतिरिक्त खात्यांच्या वाटपाचा निर्णय स्थगित ठेवा, अशी सूचना पर्रीकर यांना केली. त्यानंतरही काही मंत्र्यांनी अतिरिक्त खाती मिळावीत म्हणून दबावतंत्रही अवलंबिले. एक मंत्री तर कामेच होत नसल्याने आपण सचिवालयातच जात नाही असे जाहीरपणो सांगून मोकळे झाले.

दरम्यान, पर्रीकर यांनी गेल्या आठवड्यात मांडवी नदीवरील तिस-या पुलाला भेट दिली व सर्व मंत्र्यांना आश्चर्याचा धक्का बसला. जे मंत्री आजारी नाहीत व पूर्ण सक्रिय आहेत ते देखील नव्या तिस-या पुलावर पोहचू शकले नाहीत पण पर्रीकर आजारी असून देखील पोहचले. याचाच अर्थ पर्रीकर सक्रिय आहेत व 26 खाती सांभाळण्यास सक्षम असल्याने त्यांनी अन्य मंत्र्यांना अतिरिक्त खाती देण्याची गरजच राहिली नाही,असे भाजपाच्या एका आमदाराने लोकमतपाशी बोलून दाखवले. मुख्यमंत्री गुरुवारी (20डिसेंबर) स्वत:च्या खासगी निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठकही घेणार आहेत. पर्रीकर अतिरिक्त खाती वाटणार नाहीत, कारण लवकरच सरकारमध्येच नेतृत्व बदल होणार आहे, अशी चर्चा भाजपाच्या कोअर टीमच्या काही सदस्यांमध्ये सुरू आहे. 

Web Title: Goa cabinet meeting will be held on 20 December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.