गणेश चतुर्थीनंतरच दोघा मंत्र्यांचा 'मोरया'; मुख्यमंत्री दिल्लीत दाखल, विनोद तावडे माघारी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 07:35 AM2024-08-22T07:35:21+5:302024-08-22T07:37:25+5:30

मंत्रिमंडळाची फेररचना यापुढे होणारच हे निश्चित असल्याने व मुख्यमंत्री सावंतही रात्री दिल्लीला गेल्याने गोव्यात अनेक मंत्र्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

goa cabinet reshuffle after ganesh chaturthi cm pramod sawant reached at delhi vinod tawde returned | गणेश चतुर्थीनंतरच दोघा मंत्र्यांचा 'मोरया'; मुख्यमंत्री दिल्लीत दाखल, विनोद तावडे माघारी परतले

गणेश चतुर्थीनंतरच दोघा मंत्र्यांचा 'मोरया'; मुख्यमंत्री दिल्लीत दाखल, विनोद तावडे माघारी परतले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ फेररचना अटळ असल्याचे संकेत देऊन काही तासही उलटले नाहीत तोपर्यंत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व प्रभारी आशिश सूद गोव्यात दाखल झाले. अर्थात त्यांच्या भेटीचा हेतू हा सदस्य नोंदणी मोहीम हाच आहे. तथापि, मंत्रिमंडळाची फेररचना यापुढे होणारच हे निश्चित असल्याने व मुख्यमंत्री सावंतही रात्री दिल्लीला गेल्याने गोव्यात अनेक मंत्र्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

मंत्रिमंडळातून कोणाला डिच्चू मिळतो व नवीन कोणाची वर्णी लागते यावरुन राजकीय चर्चा रंगल्या आहेत. गणेश चतुर्थीनंतरच मंत्रिमंडळातून दोघा मंत्र्यांचा 'मोरया' होईल व दोघा आमदारांना तिथे संधी मिळेल, अशी माहिती मिळाली. कोणत्या दोघा मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, ते स्पष्ट नाही पण ज्यांचा परफॉर्मन्स विधानसभेत चांगला झाला नाही, त्यापैकी एक-दोघांचे मंत्रीपद जाऊ शकते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा येत्या शनिवारी (२४ रोजी) गोव्यात येणार आहेत. त्यावेळी मंत्रिमंडळातील काही फेरबदलांवर चर्चा होऊ शकते. नड्डा यांची भाजपच्या कोअर टीमसोबतही बैठक होणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिगंबर कामत यांना सभापतीपद व रमेश तवडकर यांना मंत्रिपद देण्याच्या हालचाली चालू आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसचे आठ आमदार फुटून भाजपात आले. पैकी नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्यात आले, परंतु लोकसभा निवडणुकीत त्याचा भाजपला काहीच फायदा झाला नाही. या विधानसभा मतदारसंघात पल्लवी धेंपे यांना केवळ २,६७७ मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस याना तब्बल १६,३६५ मते प्राप्त झाली. सिक्वेरा यांची कामगीरी अत्यंत खराब झाल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डिच्चू दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीवेळी विधानसभा अधिवेशनात काही मंत्र्यांची खराब कामगीरी झाल्याचे मान्य करताना विधानसभा निवडणुकीला दोन वर्षेच राहिली आहेत. त्यामुळे सरकारला चांगले आऊटपूट द्यावे लागेल. विकसित गोवा आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळात काही फेरबदल करावे लागतील, असे म्हटले होते. भाजपचे दोन नेते काल गोव्यात दाखल झाले. येथील इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा सभागृहात भाजपची सदस्यता कार्यशाळा आली. त्याआधी काही वेळ दोघांनीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याशी चर्चा केली त्यामुळे तर्कवितर्काना बराच ऊत आला.

लोबो बैठकीपासून दूर

१२ सदस्यीय मंत्रिमंडळात रोहन खंवटे हे सारस्वत समाजाचे असल्याने आणखी सारस्वत आमदाराचा समावेश होणार नाही. तर आमदार मायकल लोबो मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. परंतु त्यांना स्थान मिळण्याची शक्यता नाही. भाजपच्या कालच्या सदस्य नोंदणी बैठकीपासून लोबो दूर राहिले पण डिलायला उपस्थित होत्या

बदलाबाबत मुख्यमंत्री पक्षाला कळवतील : सदानंद तानावडे

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी विचारले असता ते म्हणाले की, काही बदल करायचे असतील तर तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, माझा नव्हे. मुख्यमंत्र्यांनी जर काही निर्णय घेतला असेल तर तसे निश्चीतपणे पक्षाला कळवतील. अद्याप तरी मुख्यमंत्री माझ्याकडे याविषयी काही बोललेले नाहीत.

तातडीने बदल नाहीत : सावंत

दरम्यान, गोव्यात आलेले विनोद तावडे कालच रात्री माघारी परतले. मुख्यमंत्रीही दिल्लीला गेले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी काल रात्री 'लोकमत'ने संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी आपण रात्रीच दिल्लीस आलो असल्याचे सांगितले. आज, गुरुवारी दिल्लीत आपल्या काही बैठका होतील. जीएसटी- रियल इस्टेट संबंधीही बैठक होईल, असे मुख्यमंत्र्यांनी 'लोकमत'ला सांगितले. दिल्लीत काहीही घडले तर आपण ते मिडियाला कळवीनच, शेवटी 'लोकमत'ला राजकीय बातम्या लवकर कळतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राजकीय बातम्यांचा 'लोकमत' केंद्रबिंदू आहेच असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळात आताच बदल होणार का? असे विचारले असता, तातडीने कोणतेच बदल होणार नाहीत एवढेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 

Web Title: goa cabinet reshuffle after ganesh chaturthi cm pramod sawant reached at delhi vinod tawde returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.