गोव्याचा कार्निवल १० फेब्रुवारीपासून, शिगमोत्सव २६ मार्चपासून
By किशोर कुबल | Published: January 19, 2024 08:02 PM2024-01-19T20:02:54+5:302024-01-19T20:03:22+5:30
शिवजयंतीसाठी पालिकांना ५ लाख, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले जाहीर
पणजी : राज्यात कार्निव्हल १० फेब्रुवारीपासून, शिगमोत्सव २६ मार्चपासून सुरु होणार असून विविध शहरांमध्ये चित्ररथ मिरवणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवजयंतीसाठी पालिकांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जातील.
पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अधिक माहिती देताना असे सांगितले कि,‘ तारखा जाहीर केल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर झाल्यास आयोजकांना आचारसंहितेचे पालन करावे लागेल.’ पर्यटन खात्याने काल सर्व संबंधित पालिका, पणजी महापालिकेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. कार्निवलची ‘किंग मोमो’ची प्रमुख मिरवणूक १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या आदल्या दिवशी ९ रोजी पर्वरी, ११ रोजी मडगांव, १२ रोजी वास्को आणि १३ रोजी म्हापसा येथे कार्निवल मिरवणुका होतील.
१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षांच्या पूर्तीनिमित्त डिचोली येथे शिवजयंतीचा प्रमुख कार्यक्रम होणार आहे. त्याआधी १६ ते १९ या कालावधीत पणजी, मडगांव, म्हापसा, मुरगांव, फोंडा व साखळी या सहा ठिकाणी शिवजयंती होईल. यासाठी सरकार पणजी महापालिका तसेच इतर संबंधित पालिकांना प्रत्येकी ५ लाख रुपये एकरकमी निधी देणार आहे. २६ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत राज्यात एकूण १८ ठिकाणी शिगमोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. २६ रोजी फोंडा येथे प्रमुख चित्ररथ व रोमटामेळ मिरवणूक होणार आहे. पणजी, म्हापसा, मडगाव आणि वास्को येथेही शिगमोत्सव मिरवणुका होतील.
स्टुपा स्पोर्ट्स अॅनालिटिक्सशी करार!
दरम्यान, पर्यटन खात्याने काल आज पुढील दोन वर्षांसाठी स्टुपा स्पोर्ट्स अॅनालिटिक्सशी कराराची घोषणा केली. खात्याच्या उच्चाधिकार समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ताज हॉटेलच्या एनओसीच्या अधीन राहून सिकेरी बिगर व्यावसायिक कार्निव्हल महोत्सव आयोजित करण्यास समितीने मान्यता दिली. इंग्लंडशी पर्यटन आणि इतर कामांसाठीच्या धोरणात्मक भागीदारीचा मुद्दाही या बैठकीत चर्चेसाठी आला. भारतीय उच्चायुक्तालयाने यासंदर्भात गोवा सरकारला पत्र लिहिले होते. समितीने या विषयावर अधिक सखोल चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.