गोवा : गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी कळंगुट भागात असणार सीसीटीव्हीची नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 12:17 PM2017-10-07T12:17:37+5:302017-10-07T12:17:43+5:30
किनारी भागात खास करुन कळंगुट, कांदोळी भागात वाढत्या गैरप्रकारांवर आवर घालण्यासाठी या भागात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. तसेच राखीव दलाच्या दोन अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.
म्हापसा (पणजी) - किनारी भागात खास करुन कळंगुट, कांदोळी भागात वाढत्या गैरप्रकारांवर आवर घालण्यासाठी या भागात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. तसेच राखीव दलाच्या दोन अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. कळंगुटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी या संबंधीची माहिती दिली. कळंगुट, कांदोळीसारख्या किनारी भागात वाढता पर्यटकांचा संचार लक्षात घेऊन या भागात होणा-या गैरप्रकारातसुद्धा बरीच वाढ झाली आहे.
स्थानिक तसेच पर्यटक यांच्यात वारंवार होणारी मारामारी, भांडणे सारख्या प्रकारात झालेल्या वाढीबरोबर अमली पदार्थांच्या विक्रीतही बरीच वाढ झाली आहे. मागील काही महिन्यात तर पोलिसांनी केलेल्या कारवाई ब-याच प्रमाणावर अमली पदार्थसुद्धा जप्त केला होता.
घडत असलेल्या या प्रकारावर लोबो यांना विचारले असता त्यांनी अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती दिली. मागील काही महिन्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा उल्लेख करुन लोबो यांनी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्हींचं कवच तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. कळंगुट भागातील सिकेरीपासून ते बागापर्यंत मोक्याच्या ठिकाणी असे कॅमेरे लावले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
या भागातून होणारे अमली पदार्थाचे व्यवहार बंद झाले नसल्याचे लोबो यांनी मान्य केले. हे व्यवहार बंद झाले नसले तरी त्यावर ब-याच प्रमाणात अंकुश लावण्यात यश लाभल्याची माहिती त्यांनी दिली. होणा-या या व्यवहारासंबंधी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून आढावा घेतला जात असल्याचे लोबो म्हणाले. एखाद्या ठिकाणी असे व्यवहार घडत असल्याचे निदर्शनाला आल्यास त्या संबंधीची योग्य माहिती आपल्याला पुरवण्याची सुचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केल्याचे ते म्हणाले. या व्यवसायावर नियंत्रण ठेवताना त्याच्या आहारी गेलेल्या तरूण पिढीचे योग्य प्रकारे पुर्नवसन होणे गरजेचे असल्याचे लोबो यांनी सांगितले.
या कॅमेरांवरील नियंत्रण कक्ष उभारण्यात येणा-या खास माहिती घरात असेल. या माहिती घरातून मतदारसंघातील सर्व माहिती उपलब्ध उपलब्ध करुन लोकांना सेवा दिली जाईल. त्यामुळे कळंगुट भागात येणा-या लोकां बरोबर पर्यटकांची सुद्धा सोय होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. सीसीटीव्हीबरोबर होणा-या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राखील दलाचे पोलीस तैनात केले जाणार आहेत. कांदोळी तसेच अशा दोन ठिकाणी हे दल तैनात केले जाणार असून त्यांची सततची गस्त किनारी भागात सुरु राहणार आहे.
गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना जाहीर करताना लोबो यांनी मात्र नाईट लाईफचे समर्थन केले आहे. प्रसिद्ध किनारी भागात नाईट लाईफ असणे अत्यावश्यक आहे. नाईट लाईफवर अनेक व्यवसायीक अवलंबून असून नाईट लाईफमुळेच बरेच पर्यटक आकर्षित होऊन येत असतात. तसेच पर्यटनाच्या वृद्धीसाठी सुद्धा ते आवश्यक आहे. विदेशातही ब-याच ठिकाणी बिनबोभाटपणे सुरू असल्याचे मत व्यक्त करुन या प्रकाराचे त्यांनी समर्थन केले. यावेळी लोबो यांनी स्वच्छतागृहासोबत पाण्याची तसेच पर्यटकांच्या गरजेच्या इतर व्यवस्था सुद्धा केल्या जातील अशी माहिती दिली.